कोल्हापूर : शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आणि पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र तसेच आमदार सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली. "त्यांच्या जाण्याने आमच्या आयुष्यातील आधारवड हरपला," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सतेज पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले की, ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून ८ मिनिटांनी वयाच्या ९१व्या वर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंबीयांनाच नव्हे, तर शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रालाही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
"दादांनी आयुष्यभर माणसं जोडण्याचे काम केले. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पोहोचवला आणि समाजसेवा हेच आपल्या आयुष्याचे ध्येय मानले. त्यांनी आम्हाला माणुसकी, मूल्ये आणि जबाबदारीने जगण्याचे संस्कार दिले. त्यांचा प्रेमळ सहवास, धीर देणारे शब्द आणि आयुष्यभर दिलेली शिकवण हीच आमची खरी संपत्ती आहे. या भावना शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे," असेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.
दरम्यान, डॉ. डी. वाय. पाटील यांचे अंत्यदर्शन बुधवार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत कसबा बावडा येथील यशवंत निवास येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता तेथून अंत्ययात्रेला सुरुवात होईल. सायंकाळी ५ वाजता कसबा बावडा, लाईन बाजार येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.