सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यातील कोथरूड कथित भोंदू बाबा प्रकरणात मुख्य आरोपी दीपक खडकेचा जामीन पुणे न्यायालयाकडून रद्द
  • दिवंगत पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्यावर कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या पॅव्हेलियन ग्राउंड इथं अंत्यसंस्कार सुरू
  • शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे आमदार अपात्र, त्या आधारे निवडणूक आयोग अन् राहुल नार्वेकरांचे निर्णय चुकीचे; ठाकरेंच्या वकिलांचा सडेतोड युक्तिवाद, शिवसेना कुणाची याचा निकाल लवकरच
  • काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
  • मोठी राजकीय घडामोड! रुपाली चाकणकरांनंतर अखेर नवे नेतृत्व; वैशाली नागवडे यांच्याकडे NCP महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा
 राज्य

पुण्याची ओळख कायम अबाधित राहणार?पुण्याचा RTO कोड 'MH 12' जपण्यासाठी मोहोळांचा पुढाकार; गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद

डिजिटल पुणे    05-08-2026 13:00:34

नवी दिल्ली : पुणे शहराची ओळख बनलेला MH 12 हा वाहन नोंदणी कोड बदलला जाणार असल्याच्या चर्चांमुळे पुणेकरांमध्ये चिंता व्यक्त होत असतानाच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या विषयात पुढाकार घेत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. पुण्याची ओळख असलेला MH 12 कोड कोणत्याही परिस्थितीत कायम ठेवावा आणि त्याच कोडअंतर्गत नवीन वाहन नोंदणी मालिका सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी गडकरी यांच्याकडे केली. या मागणीवर गडकरी यांनी सकारात्मक भूमिका घेत आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही दिल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) सध्या MH 12 ZZ ही वाहन नोंदणीची शेवटची मालिका सुरू आहे. ही मालिका लवकरच संपुष्टात येणार असल्याने पुढे कोणती नोंदणी पद्धत अवलंबली जाणार, याबाबत प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्याचा ऐतिहासिक MH 12 कोड बदलून नवीन कोड दिला जाऊ शकतो, अशी चर्चा रंगली होती. या चर्चेमुळे अनेक पुणेकरांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत MH 12 ही केवळ वाहन नोंदणीची मालिका नसून शहराच्या अस्मितेचा आणि ओळखीचा भाग असल्याचे मत मांडले.

या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने नितीन गडकरी यांची भेट घेत हा विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला. पुण्याचा ऐतिहासिक वारसा, शहराची वेगळी ओळख आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन MH 12 कोड कायम ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी गडकरी यांना सांगितले. तसेच विद्यमान कोडमध्येच पर्यायी नोंदणी मालिका सुरू करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय निर्णय घेण्याची विनंतीही त्यांनी केली.

या बैठकीनंतर फेसबुक पोस्टद्वारे माहिती देताना मोहोळ यांनी सांगितले की, गडकरी यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद दिला असून MH 12 कोड कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित विभागाला दिल्या जातील, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे पुण्याची ओळख जपणारा हा वाहन नोंदणी कोड कायम राहण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

दरम्यान, आरटीओच्या विद्यमान नियमानुसार दोन इंग्रजी अक्षरांच्या मालिकेतील ZZ ही अंतिम मालिका आहे. ती संपल्यानंतर पुढील नोंदणीसाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. विशेषतः पुण्यात मोठ्या प्रमाणावर वाहनांची नोंदणी होत असल्याने उपलब्ध नोंदणी क्रमांकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दुचाकी वाहनांची नोंदणी मालिका लवकरच संपणार असून चारचाकी वाहनांसाठी उपलब्ध क्रमांक आणखी काही काळ पुरतील.

नोंदणी क्रमांकांची कमतरता लक्षात घेऊन पुणे आरटीओने यापूर्वी पर्यायी मालिकांचे काही प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठवले होते. मात्र, MH 12 हा कोड कायम ठेवण्याची मागणी आता थेट केंद्रीय स्तरावर पोहोचल्याने या विषयाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्र सरकार आणि परिवहन मंत्रालय याबाबत नेमका कोणता निर्णय घेते, याकडे आता पुणेकरांसह वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.

पुण्याची ओळख, इतिहास आणि नागरिकांच्या भावनांशी जोडला गेलेला MH 12 हा कोड कायम राहिल्यास शहराच्या अस्मितेचा एक महत्त्वाचा भाग जपला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या विषयावर होणारा अंतिम निर्णय पुणेकरांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती