वारजे : कर्वेनगर परिसरातील दुर्गामाता मंदिराजवळून हरवलेल्या तीन वर्षीय प्राजू अमोल पवार हिला अवघ्या एका तासाच्या आत सुखरूप शोधण्यात पोलिसांना यश आले. पोलिस, स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सोशल मीडियाच्या समन्वयामुळे ही शोधमोहीम वेगाने पूर्ण झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्राजूचे आई-वडील सकाळी कामासाठी बाहेर गेले होते. दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास प्राजू घरातून बाहेर पडून बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेविका रेश्मा संतोष बराटे यांनी कार्यकर्त्यांसह पोलिस चौकी गाठून हरवल्याची तक्रार नोंदवली.
यानंतर चिमुकलीचा फोटो तातडीने सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. त्यानंतर नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राजू भुजबळ बंगल्याच्या दिशेने गेल्याचे समोर आले. या धाग्याच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवत गोसावी वस्ती परिसरातून तिला सुखरूप ताब्यात घेतले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकांनी समन्वयाने शोधकार्य केले. त्यानंतर प्राजूला सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकत पोलिसांच्या तत्परतेचे आणि सोशल मीडियाच्या प्रभावी वापराचे कौतुक केले.