पुणे : हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातील संशयातून घडलेल्या धक्कादायक घटनेत एका २३ वर्षीय तरुणाने लोखंडी रॉडने हल्ला करून एका तरुणाची हत्या केली, तर संबंधित तरुणी गंभीर जखमी झाली. ही घटना गुरुवारी (६ ऑगस्ट) घडली असून, आरोपीला उरुळी कांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदी करून अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दिनेश महादेव झांबरे (वय २३, रा. पळशी, ता. पंढरपूर) असे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि संबंधित तरुणीचे शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. पुढील शिक्षणासाठी दोघेही पुण्यात आले होते.
दरम्यान, संबंधित तरुणीचे तिच्याच शिक्षण संस्थेतील दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय दिनेशला होता. याच संशयातून त्याने संतापाच्या भरात तरुण आणि तरुणी राहत असलेल्या ठिकाणी जाऊन दोघांवर लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्यावर झालेल्या गंभीर वारांमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर आरोपीने वाहनातून पंढरपूरच्या दिशेने पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदी करून संशयित वाहनाचा शोध घेत आरोपीला वाहनासह ताब्यात घेतले.या प्रकरणी दिनेश महादेव झांबरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.