भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या ११३ घरमालक व पीजी चालकांवर पुणे पोलिसांची कारवाई
पुणे, दि. ८ ऑगस्ट २०२६ : पुणे शहराची सार्वजनिक सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत भाडेकरूंची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात न सादर करणाऱ्या ११३ घरमालक व पीजी चालकांवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पुणे शहरात शिक्षण, नोकरी व व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक वास्तव्यास येत असून अनेक जण भाड्याच्या घरांमध्ये, पीजी किंवा इतर निवासस्थानी राहतात. अशा वेळी संबंधित भाडेकरूंची माहिती पोलीस प्रशासनाकडे देणे ही घरमालकांची कायदेशीर जबाबदारी आहे. मात्र अनेक ठिकाणी ही माहिती न दिल्याचे निदर्शनास आल्याने विशेष मोहीम हाती घेण्यात आली.
पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार व सहपोलीस आयुक्त श्री. संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. विशेष शाखेच्या विविध पथकांनी संबंधित पोलीस ठाण्यांच्या सहकार्याने तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली.
पुणे पोलिसांनी सर्व घरमालक व पीजी चालकांना आवाहन केले आहे की, भाडेकरूंची माहिती ऑनलाइन किंवा संबंधित पोलीस ठाण्यात तात्काळ नोंदवावी. ही सुविधा punepolice.in संकेतस्थळावरील "भाडेकरू/पेईंग गेस्ट माहिती" सेवेद्वारे उपलब्ध आहे.
ही कारवाई कोथरूड, डेक्कन, आंबेगाव, नऱ्हे, चतु:श्रृंगी, खडकी, लोणीकंद, लोणी काळभोर आदी परिसरात करण्यात आली असून, अशी विशेष मोहीम पुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याची माहिती विशेष शाखेच्या वतीने देण्यात आली.