पुणे : पुण्यातील मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा.लि.या संस्थेने विकसित केलेले 'स्कोअरिंग स्किल्स' या उद्योकजीय क्षमता विकसनासाठी उपयुक्त नाविन्यपूर्ण शैक्षणिक खेळ संचाचे लोकार्पण भारत मंडपम, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या भारतीय व्यापार महोत्सवात करण्यात येणार आहे. देशभरातील नाविन्यपूर्ण उत्पादने, तंत्रज्ञान आणि उद्योजकीय संकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे चे संस्थापक मंदार नामजोशी यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली. हा महोत्सव दि.१२ ते १५ ऑगस्ट २०२६ दरम्यान होत आहे.पुण्यातील मॅप एपिक कम्युनिकेशन्सचे माहिती दालन या महोत्सवात असणार आहे.या दालनातून महोत्सवातील सर्व दिवस नाविन्यपूर्ण शैक्षणिक खेळ संचाची प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत.
'स्कोअरिंग स्किल्स' ही केवळ शैक्षणिक खेळांची मालिका नसून विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचार, समस्या सोडविण्याची क्षमता, उद्योग प्रक्रिया समजून घेण्याची वृत्ती, उद्योजकीय दृष्टिकोन आणि निर्णयक्षमता विकसित करणारी अनुभवाधारित शैक्षणिक खेळ प्रणाली आहे. 'मेकर्स बोर्ड', 'डेक ऑफ बिझनेस', गणितावरील पुस्तके आणि 'फन की गेम्स' यांसारख्या खेळ उपक्रमांद्वारे विद्यार्थी उत्पादन विकास, उद्योग साखळी, व्यवसाय नियोजन, गणितीय कौशल्ये, संघभावना आणि सर्जनशील विचार यांचा प्रत्यक्ष अनुभव घेत शिकतात. दैनंदिन जीवनाशी संबंधित एकुण ४ हजार उत्पादनांच्या निर्मिती प्रक्रिया,व्यवसाय प्रक्रिया खेळातून मांडण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.एखाद्या उद्योजक कुटुंब किंवा व्यावसायिकाच्या कुटुंबात ज्याप्रमाणे त्या-त्या उत्पादनाची आणि व्यवसायाची सुरुवातीपासूनची प्रक्रिया घरातील सदस्यांना माहित असते.त्याच धर्तीवर कोणत्याही त्रयस्थ विद्यार्थ्याला उत्पादनाची निर्मिती प्रक्रिया,व्यवसाय प्रक्रिया,सर्व टप्पे आणि फायदा-तोटा समजू शकणार आहे.त्यातून उद्योग-व्यवसायाची गोडी संवेदनशील वयात तयार होणार आहे.सोने(गोल्ड मेकिंग),शुगर कॅण्डी निर्मिती,वस्त्र निर्मिती,खेळाचे फुगे निर्मिती हे चार बोर्ड गेम पहिल्या टप्प्यात तयार करण्यात आले आहेत.पारंपरिक पाठांतराऐवजी प्रत्यक्ष सहभागातून शिक्षण अधिक प्रभावी, आनंददायी आणि कौशल्याभिमुख करण्यावर या उत्पादनाचा भर आहे.
महोत्सवादरम्यान मॅप एपिक प्रा. लि.चे प्रतिनिधी 'स्कोअरिंग स्किल्स'च्या विविध घटकांचे प्रात्यक्षिक सादर करणार असून अनुभवाधारित शिक्षण, मानसिक विकास, निरीक्षण क्षमता, धोरणात्मक विचार, नेतृत्वगुण आणि उद्योजकीय कौशल्ये विकसित करण्यात या उत्पादनाची उपयुक्तता अधोरेखित करणार आहेत. शिक्षणाला खेळ, अनुभव आणि नावीन्य यांची जोड देणाऱ्या या संकल्पनेमुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या उद्दिष्टांना बळ मिळेल आणि विद्यार्थ्यांमध्ये रोजगार शोधणाऱ्यांऐवजी रोजगार निर्माण करणारी मानसिकता विकसित होण्यास मदत होईल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.
भारतीय व्यापार महोत्सवात देश-विदेशातील उद्योग, नवउद्योजक, गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. अशा राष्ट्रीय व्यासपीठावर पुण्यातील मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि.ला आपले नाविन्यपूर्ण शैक्षणिक उत्पादन सादर करण्याची संधी मिळणे,अभिमानाची बाब आहे. या प्रदर्शनादरम्यान विविध शैक्षणिक संस्था, उद्योग प्रतिनिधी आणि संभाव्य भागीदारांसोबत संवाद साधून उत्पादनाच्या व्यापक प्रसारासाठी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन,प्रशिक्षण आणि सहकार्याच्या नव्या संधी निर्माण करण्याचामानस आहे,असे मंदार नामजोशी यांनी सांगितले.