पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-७ व दरोडा व वाहनचोरी पथक-२ यांनी जबरदस्ती चोरी व गोळीबाराच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांत छडा लावत उत्तर प्रदेशातील तीन सराईत आरोपींना मध्य प्रदेशातील इंदूर येथून अटक केली आहे.
दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास शिरसवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथे फिर्यादीच्या भावावर जीवघेणा गोळीबार करून आरोपींनी त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याच्या गळ्यातील सुमारे ११ लाख रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चेन जबरदस्तीने हिसकावून आरोपी पसार झाले. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा माग काढला. अवघ्या १२ तासांत मध्य प्रदेशातील इंदूर येथून तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, लुटीतील मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेल्या शस्त्राचा पुढील तपास सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अविनाश कृष्णचंद्र त्रिपाठी (वय ४३), सुरेंद्रपाल रामचंद्र पाल (वय ३२) आणि मोहम्मद शोएब वसीम खान (वय ३७) यांचा समावेश आहे. हे तिघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी असून त्यांच्यावर चोरी, दरोडा, खून व खुनाचा प्रयत्न यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुख्य आरोपी अविनाश त्रिपाठी याच्यावर २० हून अधिक गुन्हे नोंद असून त्याच्या अटकेसाठी ₹५०,००० चे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.