मुंबई : विक्रोळी पश्चिमेतील पार्कसाईट परिसरातील राहुल नगरमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडाला काही दिवस उलटत नाहीत तोच या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. वडील आणि १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झालेल्या त्याच घराला सोमवारी पहाटे अचानक भीषण आग लागली. या आगीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले. विशेष म्हणजे, तपासासाठी पोलिसांनी हे घर सील केले होते. त्यामुळे ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत संशय निर्माण झाला आहे.
राहुल नगरमध्ये ६ ऑगस्ट रोजी पहाटे मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या कारणावरून सुनील विश्वकर्मा आणि त्यांच्या भावांमध्ये वाद झाला होता. चार सख्खे भाऊ एकाच घरात राहत असल्याची माहिती आहे. गाण्याच्या आवाजावरून सुरू झालेला वाद काही वेळातच हाणामारीपर्यंत पोहोचला. त्यानंतर सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा यांनी सुनील विश्वकर्मा यांच्या कुटुंबावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात सुनील विश्वकर्मा (४०) आणि त्यांचा १४ वर्षीय मुलगा श्लोक विश्वकर्मा गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. तर सुनील यांची पत्नी अंजू विश्वकर्मा आणि धाकटा मुलगा विवान हे या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी दोन्ही आरोपी भावांना ताब्यात घेतले आहे.
तपासासाठी सील केलेल्या घरालाच आग
दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी घटनास्थळ असलेले घर पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी सील केले होते. मात्र, सोमवारी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास याच घराला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. त्यानंतर घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिसरात मोठा आवाज झाला.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र या घटनेत घर पूर्णपणे जळून खाक झाले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही.
सील केलेल्या घरात आग लागल्याने संशय वाढला
हत्याकांडाचा तपास सुरू असतानाच पोलिसांनी सील केलेल्या घरात आग लागल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. घराला आग लागण्यामागे नेमके कारण काय? सिलिंडरचा स्फोट हा आगीचे कारण ठरला की आगीमुळे सिलिंडरचा स्फोट झाला? तसेच ही घटना अपघाती आहे की पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने घडवून आणण्यात आली, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.पार्कसाईट पोलीस या आगीचा सर्व बाजूंनी तपास करत असून घटनास्थळाची पाहणी आणि तांत्रिक तपासातून आगीचे नेमके कारण शोधले जात आहे. त्यामुळे दुहेरी हत्याकांडानंतर आता या आगीच्या घटनेमुळे प्रकरणात आणखी कोणते रहस्य उलगडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.