पुणे : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पुण्यात ११ ऑगस्ट २०२६ रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तिरंगा गौरव समिती, पुणे यांच्या वतीने ही रॅली काढण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे. रॅलीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
ही तिरंगा रॅली ललित महल हॉटेल चौक ते गरवारे चौक या मार्गावर होणार आहे. रॅलीचा प्रमुख मार्ग ललित महल हॉटेल चौक – ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक – तुकाराम महाराज पादुका चौक – गुडलक चौक – गरवारे चौक असा निश्चित करण्यात आला आहे.
रॅलीच्या कालावधीत ११ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजल्यापासून रॅली संपेपर्यंत फर्ग्युसन कॉलेज रोड तसेच या मार्गाला जोडणारे काही उपरस्ते आवश्यकतेनुसार तात्पुरते बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे या परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी रॅलीच्या मार्गावरून प्रवास करताना वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वारगेटकडून पुणे विद्यापीठाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी अलका चौक, खंडोजीबाबा चौक, वीर सावरकर चौक, अण्णा भाऊ साठे चौक, ना. सी. फडके चौक, मंगीरबाबा चौक, सेनादत्त चौक, बालशिवाजी-महात्रे पूल, नळ स्टॉप आणि लॉ कॉलेज रोड या मार्गाचा पर्याय देण्यात आला आहे.
तसेच स्वारगेटकडून खडकी किंवा जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी अण्णा भाऊ साठे चौक, पुरम चौक, बाजीराव रोड, गाडगीळ पुतळा, कुंभार वेस आणि आरटीओ चौक या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
खंडोजी बाबा चौक परिसरात येणाऱ्या वाहनांसाठीही नळ स्टॉप, पौड फाटा, आठवले चौक, लॉ कॉलेज रोड, अलका टॉकीज चौक, केळकर रस्ता, नदीपात्र, शनिवारवाडा आणि गाडगीळ पुतळा या मार्गांद्वारे वाहतूक वळवण्यात येणार आहे.
गरवारे चौक ते चाफेकर चौक या मार्गावरही वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. गरवारे चौकातून तुकाराम पादुका चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, ललित महल चौक आणि पुढे चाफेकर चौकाकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रॅलीदरम्यान नागरिकांनी वाहतूक पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच वाहतूक कर्मचारी आणि मदतनीस यांना सहकार्य करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे.त्यामुळे ११ ऑगस्ट रोजी दुपारनंतर फर्ग्युसन कॉलेज रोड, गरवारे चौक, गुडलक चौक आणि परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वाहतूक बदलांची दखल घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे.