रांची : सरकारी भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकार, पेपरफुटी आणि परीक्षेच्या पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. JPSC आणि JSSC परीक्षांचे उमेदवार गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत असून, सोमवारी (10 ऑगस्ट) विद्यार्थ्यांनी झारखंड विधानसभेकडे मोर्चा काढला. मोर्चादरम्यान परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करण्यात आला. काही ठिकाणी लाठीचार्जही करण्यात आल्याची माहिती आहे.
विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स पार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी काटेरी तारांचे अडथळे उभारून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांकडून पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकण्यात आल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे रांचीतील आंदोलनाला काही ठिकाणी तणावाचे स्वरूप आले.
अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया
झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये केवळ “झारखंडच्या विद्यार्थ्यांशी एकजूट...” एवढेच म्हणत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या या छोट्याशा प्रतिक्रियेकडेही सोशल मीडियावर लक्ष वेधले जात आहे.
विद्यार्थ्यांचा नेमका आक्षेप काय?
JPSC आणि JSSCच्या विविध भरती परीक्षांच्या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. पेपरफुटी, निकालातील कथित अनियमितता आणि परीक्षा प्रक्रियेबाबत निर्माण झालेले प्रश्न यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी वाढली आहे.
JSSC-CGL पेपरफुटीचा मुद्दा चर्चेत
JSSC-CGL परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचा असंतोष आधीपासूनच आहे. या प्रकरणाच्या तपासानंतरही भरती परीक्षांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न कायम असल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.
JPSC 14व्या परीक्षेच्या निकालावरही प्रश्न
JPSCच्या 14व्या संयुक्त स्पर्धा परीक्षेच्या प्राथमिक निकालावर उमेदवारांनी आक्षेप नोंदवले आहेत. निकाल प्रक्रिया, श्रेणीनुसार कट-ऑफ, कागदपत्रांवरील स्वाक्षऱ्या तसेच सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या OMR शीटसंदर्भातील मुद्द्यांची चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
CBI चौकशीसह विविध मागण्यांवर विद्यार्थी ठाम
विद्यार्थ्यांची मागणी केवळ परीक्षा रद्द करण्यापुरती मर्यादित नाही. कथित गैरप्रकारांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच गरज असल्यास संबंधित परीक्षा पुन्हा घेण्यात याव्यात, अशी त्यांची भूमिका आहे. संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणीही आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
25 जुलैपासून सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. सरकारने तीन परीक्षा रद्द करण्यास सहमती दर्शवल्याचे सांगितले जात असले तरी CBI चौकशीसह अन्य मागण्यांवर समाधान न झाल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. दरम्यान, JPSCच्या तीन सदस्यांनी राजीनामे दिल्याची माहितीही समोर आली आहे.
रांचीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था
विधानसभेवरील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रांचीमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. विधानसभेच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून मोठ्या संख्येने पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विविध ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत.यापूर्वी विद्यार्थ्यांनी तिरंगा मार्चही काढला होता. त्यामुळे आता विधानसभेवरील मोर्च्यानंतर सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.