सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘भारताला थांबवण्याची ताकद कुणातही नाही’; तिरंगा रॅलीत देवेंद्र फडणवीसांचा परकीय शक्तींना इशारा
  • लोहमार्गासाठी महामार्गावर क्रांतीची मशाल; सर्वपक्षीयांसह ग्रामस्थांचे पुणे-नाशिक मार्गावर ‘चक्का जाम’ आंदोलन
  • मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
  • मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
 शहर

विधिसंघर्षग्रस्त बालकांसाठी ‘संवाद परिवर्तन यात्रा’; Moving Inspiration Labचा अभिनव उपक्रम

डिजिटल पुणे    10-08-2026 16:48:00

पुणे : विधिसंघर्षग्रस्त बालकांना गुन्हेगारीच्या प्रवृत्तीपासून दूर नेत त्यांच्या मनात सकारात्मक विचार, आत्मविश्वास, शिक्षण, कौशल्य आणि उज्ज्वल भविष्याची भावना निर्माण करण्यासाठी पुणे पोलिस आणि आदर्श मित्र मंडळ, धनकवडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संवाद परिवर्तन यात्रा – Moving Inspiration Lab’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाचे मार्गदर्शक पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे तसेच अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे आहेत. उपक्रमाचे संयोजन पोलीस उपायुक्त परिमंडळ ३, पुणे शहर डॉ. सागर कवडे करीत आहेत.

‘रिअल हिरोजसोबत एक दिवस’ उपक्रमातून प्रेरणा

‘रिअल हिरोजसोबत एक दिवस’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात विधिसंघर्षग्रस्त बालकांना विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. पोलीस अधिकारी, डॉक्टर, उद्योजक, खेळाडू, कलाकार, सैनिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आपल्या संघर्षमय जीवनप्रवासाचे अनुभव बालकांसमोर मांडणार आहेत.

या संवादातून परिश्रम, शिस्त, सकारात्मक विचार आणि योग्य दिशेचे महत्त्व बालकांना प्रत्यक्ष अनुभवातून समजावून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ऐतिहासिक व प्रेरणादायी स्थळांना भेट

‘संवाद परिवर्तन यात्रा’दरम्यान बालकांना पुण्यातील ऐतिहासिक व प्रेरणादायी स्थळे, पोलीस स्टेशन, उद्योग-व्यवसाय, कौशल्य विकास केंद्रे तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणी भेटी देण्यात येणार आहेत. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांकडून बालकांना मार्गदर्शन मिळणार असून, समाजातील सकारात्मक संधींची ओळख करून दिली जाणार आहे.

‘Dream Passport – माझे नवे स्वप्न’

यात्रेच्या प्रारंभी प्रत्येक सहभागी बालकाला ‘Dream Passport – माझे नवे स्वप्न’ ही प्रेरणादायी डायरी देण्यात येणार आहे. या डायरीच्या माध्यमातून बालकांना स्वतःची स्वप्ने, आवडी, कौशल्ये आणि भविष्यातील ध्येय याबाबत विचार करण्यास प्रोत्साहित केले जाणार आहे.

दिवसाच्या शेवटी प्रत्येक बालक आपल्या भविष्याच्या ध्येयाची नोंद करून ‘मी बदलू शकतो… मी घडू शकतो!’ अशी प्रेरणादायी प्रतिज्ञा करणार आहे. सहभागी बालकांना ‘संवाद परिवर्तन सहभाग प्रमाणपत्र’ देखील देण्यात येणार आहे.

केवळ सहल नव्हे, तर परिवर्तनाची चळवळ

‘संवाद परिवर्तन यात्रा’ ही केवळ सहल नसून ‘अनुभवातून परिवर्तन’ घडविणारी सामाजिक चळवळ असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या पुनर्वसनासाठी समाज, पोलीस यंत्रणा आणि विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी व्यक्तींना एका व्यासपीठावर आणण्याचा हा प्रयत्न आहे.

‘प्रत्येक बालकात एक स्वप्न असते; त्या स्वप्नाला योग्य दिशा मिळाली तर त्याचे भविष्य बदलू शकते,’ या विचारातून हा उपक्रम राबविला जात असून, बालकांच्या आयुष्यात नवी आशा, नवी दिशा आणि नव्या संधींचे दरवाजे खुले करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या उपक्रमाची पुढील काळातही नियमितपणे अंमलबजावणी करण्यात येणार असून, अधिकाधिक विधिसंघर्षग्रस्त बालकांना त्याचा लाभ मिळवून देण्याचा पुणे पोलिस आणि आदर्श मित्र मंडळाचा मानस आहे.


 Give Feedback



 जाहिराती