मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक आणि तरुण सहभागी झाले होते. यावेळी फडणवीसांनी देशभक्तीपर वातावरणात जोरदार भाषण करत भारताच्या प्रगतीचा आणि युवा शक्तीचा उल्लेख केला.
फडणवीस म्हणाले की, भारताची प्रगती थांबवण्याचा प्रयत्न काही परकीय शक्तींकडून केला जात आहे. भारताची आर्थिक आणि तांत्रिक क्षेत्रातील वाढ पाहता जगातील महासत्ता बनण्याची क्षमता देशाने निर्माण केली आहे. त्यामुळे काही शक्तींना भारताची ही घोडदौड रोखायची आहे, असा दावा त्यांनी केला.
‘तिरंगा हाती घेतलेली तरुणाई थांबणार नाही’
मुंबईतील तिरंगा रॅलीकडे पाहताना एकीकडे हिंद महासागर तर दुसरीकडे तिरंग्याचा महासागर दिसत असल्याचे फडणवीसांनी सांगितले. भारताची युवा शक्ती ही देशाची सर्वात मोठी ताकद असून, तिला रोखणे कोणालाही शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारत आयटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि विविध आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगातील प्रमुख देशांशी स्पर्धा करत आहे. देशाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असून, विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी तरुणाईची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘भारताला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही’
भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींनाही फडणवीसांनी थेट संदेश दिला. तिरंगा हातात घेऊन देशासाठी पुढे आलेल्या तरुणाईला थांबवण्याची ताकद कोणाकडेही नाही. भारताची विकासयात्रा अशीच सुरू राहणार असून 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘भारत छोडो’पासून ‘विकसित भारत’पर्यंतचा संकल्प
9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झालेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनाचा संदर्भ देत फडणवीसांनी आजच्या पिढीसमोर विकसित भारताचे लक्ष्य असल्याचे सांगितले. देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने पुढे जाण्याची गरज आहे. तिरंगा हातात घेऊन नवभारताच्या निर्मितीसाठी योगदान देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत एकजुटीने, देशभक्तीच्या भावनेने आणि विकासाच्या संकल्पाने पुढे जाण्याचे आवाहन केले.