पुणे : कथक नृत्यांगना शांभवी दांडेकर यांना सॅनफ्रान्सिस्को येथे नॅार्थ अमेरिकन फिल्म फेस्टिवल मध्ये 'वूमन ऑफ एक्सलन्स' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रपट निर्माते अभि घोलप यांच्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (नाफा )या संस्थेतर्फे आयोजित सोहळ्यात अभिनेत्री गिरिजा ओक -गोडबोले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.शांभवी दांडेकर या ज्येष्ठ नृत्यगुरू गुरु पं. मनीषा साठे आणि तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या शिष्या आहेत.
शांभवीज इंटरनॅशनल स्कूल ऑफ कथक या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून शांभवी दांडेकर यांनी गेल्या १२ वर्षात सॅनफ्रान्सिस्को जवळील बे एरियात आणि अमेरिकेतील इतर अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये कथक नृत्याचा प्रसार,प्रचार करून असंख्य विद्यार्थ्यांपर्यंत ही कला पोहोचवली आहे. विशेषतः आय टी क्षेत्रात मानाच्या कंपन्यांमध्ये अतिशय मोठ्या पदांवर काम करणाऱ्या शेकडो महिलांना त्यांनी नृत्याची गोडी लावली, त्यामुळे महिलांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले. नृत्य शिकवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अभिनव प्रयोग करून त्यांनी राबवलेल्या ‘डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम‘ च्या माध्यमातून आज जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक उच्चपदस्थ महिला नृत्य शिकत आहेत.दि.७ ऑगस्ट २०२६ रोजी हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम सॅनफ्रान्सिस्को येथे झाला.