सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘भारताला थांबवण्याची ताकद कुणातही नाही’; तिरंगा रॅलीत देवेंद्र फडणवीसांचा परकीय शक्तींना इशारा
  • लोहमार्गासाठी महामार्गावर क्रांतीची मशाल; सर्वपक्षीयांसह ग्रामस्थांचे पुणे-नाशिक मार्गावर ‘चक्का जाम’ आंदोलन
  • मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
  • मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
 राज्य

ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन अपघातातून थोडक्यात बचावला; पोर्शे कारला वॅगन-आरची धडक

डिजिटल पुणे    11-08-2026 15:36:28

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचा मुलगा आणि पार्श्वगायक ए. आर. अमीन याच्या कारला चेन्नईत अपघात झाला. सोमवारी, १० ऑगस्ट रोजी सकाळी गिंडी परिसरातील काथीपारा उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात अमीन आणि त्याच्यासोबत असलेल्या मित्रांना गंभीर दुखापत झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, अमीन आपल्या पोर्शे कारमधून प्रवास करत असताना एका बाजूच्या रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर आलेल्या वॅगन-आर कारची त्याच्या वाहनाला धडक बसली. या धडकेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली.

अमीन थोडक्यात बचावला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमीन आपल्या मित्रांसोबत कोयंबेडूच्या दिशेने प्रवास करत होता. त्याचवेळी हा अपघात झाला. कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, कोणालाही गंभीर इजा झालेली नाही. पोलिसांकडून या अपघाताचा अधिक तपास केला जात आहे.दरम्यान, या घटनेबाबत ए. आर. रहमान किंवा अमीन यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

अमीनही संगीत क्षेत्रात सक्रिय

ए. आर. रहमान यांच्याप्रमाणेच त्यांचा मुलगा अमीनदेखील संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. तो पार्श्वगायक असून त्याने विविध भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत. चित्रपटांमधील गायनासोबतच अमीन स्वतंत्र म्युझिक प्रोजेक्ट्सवरही काम करतो.

अमीनने २०१५ मध्ये ‘ओ कधल कणमणी’ या तमिळ चित्रपटातून गायन क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. नुकतेच त्याने राम चरणच्या ‘पेड्डी’ चित्रपटातील ‘चिकिरी चिकिरी’ हे गाणे तमिळमध्ये गायले आहे.याशिवाय गायिका जसलीन रॉयलसोबत त्याचा ‘भीगी भीगी’ हा स्वतंत्र ट्रॅकही रिलीज झाला आहे. या गाण्यात दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूर झळकले होते. अमीन आपल्या वडिलांसोबत विविध ठिकाणी कॉन्सर्टमध्येही परफॉर्म करताना दिसतो.

ए. आर. रहमान यांच्या आगामी प्रोजेक्ट्सची चर्चा

दरम्यान, ए. आर. रहमान सध्या अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘रामायण: भाग १’, ‘रामायण: भाग २’, ‘बंटवारा १९४७’ आणि ‘मून वॉक’ यांसारख्या प्रोजेक्ट्सचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.अमीनच्या अपघाताची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांकडून त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही गंभीर दुखापत झालेली नसल्याची माहिती आहे.


 Give Feedback



 जाहिराती