पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’च्या पुणे-मुंबई दिशेच्या मार्गिकेवर बुधवारी, १२ ऑगस्ट रोजी देखभाल-दुरुस्तीचे काम आणि मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी १२ ते ३ या तीन तासांच्या कालावधीत या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना कनेक्टिंग लिंकऐवजी जुन्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घाटमार्गाने मुंबईच्या दिशेने वळवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासापूर्वी या वाहतूक बदलाची माहिती लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे.
दरम्यान, कनेक्टिंग लिंकवरील मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी मार्गिका सुरू राहणार आहे. त्यामुळे या दिशेची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येणार आहे.
देखभाल-दुरुस्तीचे काम आणि मॉक ड्रिल सुरळीत पार पडण्यासाठी वाहनचालकांनी संबंधित कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवासादरम्यान काही अडचण किंवा वाहतुकीसंदर्भात मदतीची आवश्यकता भासल्यास मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग नियंत्रण कक्षाशी ९८२२४९८२२४ किंवा महामार्ग पोलीस विभागाशी ९८३३४९८३३४ या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे.