बीड : बीडच्या पिंपळनेर परिसरात कौटुंबिक वादातून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या अनुष्का शिरसाट यांचा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबात अनुष्का यांनी पतीकडून होत असलेल्या छळाची माहिती देत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती.
मुलाच्या डोळ्यांसमोर घडला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का आणि त्यांचे पती मिलिंद शिरसाट यांच्यात कौटुंबिक कारणांवरून वारंवार वाद होत होते. मिलिंद हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचा आरोप आहे. ७ ऑगस्ट रोजी झालेल्या वादादरम्यान मिलिंदने अनुष्का यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिल्याचा आरोप आहे.घटनेवेळी त्यांचा मुलगाही तेथे उपस्थित होता. आईला वाचवण्यासाठी मुलाने वडिलांकडे विनवणी केली. मात्र, त्यानंतरही अनुष्का यांना पेटवून दिल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले.
मृत्यूपूर्वी पोलिसांना दिला जबाब
घटनेनंतर अनुष्का यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, ८ ऑगस्ट रोजी पोलिसांनी अनुष्का यांचा जबाब नोंदवला होता. पतीकडून आपल्याला आणि मुलाला मारहाण व छळ केला जात असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तसेच, मुलाने आईला वाचवण्यासाठी वडिलांकडे विनवणी केल्याचेही त्यांनी जबाबात नमूद केले. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली होती.
आरोपी पती बीडमधून अटकेत
अनुष्का या अंगणवाडी कार्यकर्त्या म्हणून काम करत होत्या. त्यांच्या उत्पन्नावरूनही पतीकडून नियंत्रण ठेवले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. कौटुंबिक वाद आणि चारित्र्याच्या संशयातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेनंतर मिलिंद शिरसाट फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेत बीडमधून त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, घटनेमागील संपूर्ण कारणे आणि घटनाक्रम तपासला जात आहे.