सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवर राज ठाकरे संतापले; ‘ज्यांना सत्ता दिली, त्यांनाच जाब विचारा’
  • शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
 विश्लेषण

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा, फडणवीसांचं मोठं वक्तव्य

डिजिटल पुणे    14-08-2026 17:49:35

जालना : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची राज्यातील लाखो महिला लाभार्थी प्रतीक्षा करत आहेत. पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा केले जातात. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना येथील भाजपच्या कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. काहीही झालं तरी ही योजना बंद केली जाणार नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

फडणवीस म्हणाले की, विरोधकांकडून लाडकी बहीण योजना बंद होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र, आम्ही योजना बंद केलेली नाही आणि काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

तसंच, पुढील पाचही वर्षे लाडक्या बहिणींना पैसे देत राहणार असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं. यासोबतच राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने आता १ कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचं लक्ष्य ठेवल्याची माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत ५० लाख महिला लखपती दीदी झाल्याचा दावाही त्यांनी केला.

कर्जमाफीवरही फडणवीसांचं भाष्य

शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना फडणवीस यांनी, कोणतीही निवडणूक नसताना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून, काही तांत्रिक अडचणी असल्यास त्या दूर करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

जुलैच्या हप्त्यासाठी ३४४ कोटींचा निधी वितरित

दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी सामाजिक न्याय विभागाकडून ३४४ कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यानंतर लाभार्थी महिलांची ई-केवायसी प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेनंतर पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी झाली असून, सध्या सुमारे १ कोटी ६७ लाख महिला या योजनेच्या पात्र लाभार्थी असल्याची माहिती आहे.त्यामुळे आता जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार, याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे.


 Give Feedback



 जाहिराती