सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नाशिक-रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला; महाजनांकडे नाशिकची धुरा, गोगावलेंची रायगडवर नियुक्ती
  • 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
 शहर

सिंहगडावर सलग दोन दिवस राडा; मारामारी, दगडफेकीने खळबळ, पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

डिजिटल पुणे    17-08-2026 13:05:32

खडकवासला : पावसाळ्यात हिरवाईने नटलेला सिंहगड, गडाभोवती पसरलेले धुके आणि सुट्टीचा दिवस यामुळे सध्या सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना गेल्या दोन दिवसांत मारामारी आणि वादाच्या घटनांना सामोरे जावे लागल्याने गडावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शनिवारी दोन गटांमध्ये हाणामारी आणि दगडफेक झाली, तर रविवारी अल्पवयीन मुलीच्या कपड्यांवरून वाद निर्माण होऊन महिला आणि इतर व्यक्तींना मारहाण झाल्याचा आरोप समोर आला आहे.

पावसामुळे सिंहगड परिसर सध्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. शनिवार-रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी हजारो नागरिक कुटुंबीय आणि मित्रमंडळींसह गडावर येतात. लहान मुलांसह कुटुंबांचीही मोठी संख्या असते. अशा परिस्थितीत पर्यटकांच्या गर्दीतच हिंसक घटना घडत असल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.

पुणे दरवाज्याजवळ हाणामारी आणि दगडफेक

शनिवारी पुणे दरवाज्याजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत काही तरुणांनी तरुणींशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद वाढत जाऊन दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. काही वेळातच दगडफेक सुरू झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.

या घटनेचे काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाले असून, त्यामध्ये पर्यटकांच्या गर्दीत मारामारी आणि दगडफेक होत असल्याचे दिसून येत आहे. घटनेमुळे परिसरातील इतर पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांच्या माहितीनुसार, छत्री लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता. घटनेनंतर दोन्ही गटांना त्याच दिवशी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. मात्र, दोन्ही गटांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले.

रविवारी कपड्यांवरून वाद; मारहाणीचा आरोप

शनिवारच्या घटनेनंतर अवघ्या एका दिवसाने म्हणजे रविवारी पुन्हा सिंहगडावर वादाचा प्रकार घडला. नरवीर तानाजी मालुसरे समाधी परिसरात एका अल्पवयीन मुलीच्या कपड्यांवरून काही व्यक्तींमध्ये वाद झाला. त्यानंतर परिस्थिती चिघळली आणि मुलगी, महिला तसेच तिच्या कुटुंबीयांसोबत असलेल्या व्यक्तीला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला.

महिला आणि मुलांच्या दिशेने धाव घेत त्यांना मारहाण केल्याचा आरोपही या घटनेत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे समाधी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

मुलांसमोर हिंसक प्रकार; कुटुंबांनी गड सोडला

सिंहगडावर फिरण्यासाठी आलेल्या अनेक कुटुंबांच्या समोरच मारामारीचे प्रकार घडल्याने त्यांना धक्का बसला. लहान मुलांना घेऊन आलेल्या काही पर्यटकांनी परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच गडावर न थांबता पार्किंगच्या दिशेने जाणे पसंत केले.

गडावर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागत असल्याने सिंहगडाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ऐतिहासिक वारसा असलेल्या या गडावर शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

गर्दी नियंत्रणाचेही मोठे आव्हान

सध्या सिंहगडावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. वाहनतळ पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर गडाकडे जाणाऱ्या पर्यटकांना रस्त्यातच थांबवावे लागते. मात्र, गर्दी कमी करण्यासाठी पर्यटकांना रोखल्यास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी वाद होण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे एकीकडे वाढती गर्दी आणि दुसरीकडे सुरक्षेचा प्रश्न, अशा दुहेरी आव्हानाचा सामना प्रशासनाला करावा लागत आहे.

गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त, नियमित गस्त आणि संवेदनशील ठिकाणी अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे. तसेच पर्यटकांनीही नियमांचे पालन करून वाद टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

पोलिसांकडून कारवाईची प्रक्रिया सुरू

रविवारी झालेल्या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनीता चौरे यांना तातडीने सिंहगडावर पाठविण्यात आले. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, शनिवारी आणि रविवारी घडलेल्या दोन्ही घटना वैयक्तिक वादातून झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असले, तरी अशा घटनांचा परिणाम सिंहगडावर येणाऱ्या सर्वसामान्य पर्यटकांच्या सुरक्षिततेवर होत आहे. त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

सिंहगड हा पुणे जिल्ह्याच्या पर्यटन आणि ऐतिहासिक वारशातील महत्त्वाचा गड आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरण मिळणे आवश्यक आहे. सलग दोन दिवस घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता वन विभाग आणि पोलिस प्रशासन पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना करते, याकडे पर्यटकांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती