नाशिक : राज्यातील नाशिक आणि रायगड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा प्रदीर्घकाळ सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. राज्य सरकारने दोन्ही जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली आहे. त्यानुसार गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी, तर भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये गेल्या दीड वर्षांपासून रस्सीखेच सुरू होती. भाजपकडून गिरीश महाजन, शिवसेनेकडून दादा भुसे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांच्या नावांची चर्चा होती. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय सातत्याने रखडला होता.
महायुती सरकारच्या स्थापनेनंतर सुरुवातीला गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्रिपद सोपवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर महायुतीतील अंतर्गत राजकीय समीकरणांमुळे हा निर्णय बदलण्यात आला आणि नाशिकला दीर्घकाळ कायमस्वरूपी पालकमंत्री मिळाला नव्हता.
दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबतही बराच काळ अनिश्चितता होती. अखेर शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.
नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. कुंभमेळ्याच्या तयारीसह जिल्ह्यातील विकासकामे, प्रशासकीय समन्वय आणि महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
तर रायगडमध्ये भरत गोगावले यांच्यावर जिल्ह्याच्या विकासकामांसह प्रशासन आणि स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नांवर समन्वय साधण्याची जबाबदारी राहणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा अध्याय अखेर संपला आहे.