सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नाशिक-रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला; महाजनांकडे नाशिकची धुरा, गोगावलेंची रायगडवर नियुक्ती
  • 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
 जिल्हा

तारापूर एमआयडीसी हादरली! विराज प्रोफाईल कंपनीत सलग तीन स्फोट; लोखंडी पत्रे उडाली, तीन कामगार जखमी

डिजिटल पुणे    17-08-2026 15:07:20

पालघर : बोईसर येथील तारापूर एमआयडीसी परिसरातील विराज प्रोफाईल कंपनीत सोमवारी सकाळी सलग तीन शक्तिशाली स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोटांची तीव्रता एवढी होती की, कारखान्याच्या परिसरातील लोखंडी पत्रे उडून पडली, तर सुरक्षारक्षकांच्या केबिन परिसरातील काचाही फुटल्या. अचानक झालेल्या जोरदार आवाजामुळे कंपनीतील कामगारांसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

विराज प्रोफाईल कंपनी तारापूर एमआयडीसीतील एसएमएस-वन प्लांटमध्ये कार्यरत असून, येथे भंगार वितळवून स्टील तयार केले जाते. सोमवारी सकाळी पहिल्या शिफ्टमधील कामगारांनी नेहमीप्रमाणे उत्पादनाचे काम सुरू केले होते. त्यानंतर काही वेळातच कंपनीतील फर्नेस टँकमध्ये जोरदार स्फोट झाला. या घटनेनंतर एकापाठोपाठ आणखी दोन स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटना घडली त्यावेळी कंपनीत सुमारे 100 ते 150 कामगार उपस्थित असल्याची माहिती आहे. स्फोटानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत तीन कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्फोटाच्या तीव्रतेमुळे कंपनीच्या परिसरातील बांधकामाचे लोखंडी पत्रे उडून पडल्याचे दिसून आले. तसेच सुरक्षारक्षकांच्या केबिनच्या भागातील काचा फुटल्याने स्फोट किती शक्तिशाली होता, याची कल्पना येत आहे. घटनास्थळी प्रशासनाकडून पाहणी सुरू असून, आणखी कोणी जखमी झाले आहे का, याची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, तारापूर एमआयडीसीमध्ये औद्योगिक दुर्घटनांच्या घटना वारंवार समोर येत असल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मोठ्या संख्येने कामगार कार्यरत असलेल्या या औद्योगिक परिसरात सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. स्फोटाचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती