पुणे : विस्तारत जाणारे पुणे, झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाढते आयटी आणि औद्योगिक क्षेत्र, नव्याने विकसित होणाऱ्या निवासी व व्यावसायिक वसाहती आणि त्यासोबत वाढणारी वाहनांची संख्या यामुळे शहरासमोरील वाहतुकीचे आव्हान दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. पुण्याच्या विकासाचा वेग कायम ठेवायचा असेल, तर पायाभूत सुविधांचा विस्तार आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन याला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. हीच गरज लक्षात घेऊन पुण्यात विविध रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो, विमानतळ आणि सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांना गती दिली जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही पुण्याच्या विकासाकडे विशेष लक्ष असून, भविष्यातील पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्यांनी मांडलेली ‘पाताळ लोक’ अर्थात भुयारी मार्ग आणि रस्त्यांच्या संकल्पनेतून शहराच्या वाहतुकीला नवे पर्याय उपलब्ध करून देण्याचा व्यापक विचार पुढे येत आहे.
याच विकासदृष्टीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पुण्याच्या पूर्व भागातील केशवनगर–खराडी उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. “पुण्याची वाढती गरज लक्षात घेता वाहतूक समस्या सोडवणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य आहे. केशवनगर–खराडी उड्डाणपूल हा केवळ वाहतूक कोंडी कमी करणारा प्रकल्प नसून पुण्याच्या पूर्व भागाच्या भविष्यातील विकासाला गती देणारी महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केले.
खराडी हे पुण्याचे महत्त्वाचे आयटी हब म्हणून झपाट्याने विकसित होत आहे. त्याचबरोबर केशवनगर, मुंढवा, वडगाव शेरी आणि परिसरात मोठ्या प्रमाणात निवासी व व्यावसायिक विकास झाला आहे. परिणामी या भागातील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे. दररोज हजारो नागरिक कामानिमित्त या मार्गावरून प्रवास करतात. या पार्श्वभूमीवर केशवनगर–खराडी उड्डाणपूल नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
या उड्डाणपुलामुळे केशवनगरकडून खराडीकडे जाणाऱ्या वाहनांचा सुमारे ६ किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास टाळता येणार असून, बायपास रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा दररोजचा सुमारे अर्धा तास प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होईल. वाहतुकीचा वेग वाढण्यासोबतच इंधनाची बचत होईल आणि वाहनांमुळे होणारे वायू व ध्वनी प्रदूषण कमी करण्यासही या प्रकल्पाचा हातभार लागणार आहे.
खराडीतील आयटी पार्क, व्यावसायिक केंद्रे आणि वाढत्या निवासी भागांमुळे भविष्यात या परिसरातील वाहतूक आणखी वाढणार आहे. त्यामुळे उभारण्यात आलेला हा उड्डाणपूल केवळ वर्तमानातील वाहतूक समस्या सोडवणारा प्रकल्प नसून भविष्यातील पुण्याची गरज लक्षात घेऊन उभारलेली महत्त्वाची सुविधा आहे. पुण्याच्या पूर्व भागातील केशवनगर, खराडी, मुंढवा, वडगाव शेरी तसेच लगतच्या परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला यामुळे मोठी गती मिळणार आहे.
“पुण्याचा विकास हा केवळ शहराच्या मध्यवर्ती भागापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महानगर क्षेत्राचा संतुलित विकास झाला पाहिजे, ही भूमिका आहे. त्यासाठी रस्ते आणि उड्डाणपुलांसोबतच मेट्रो, विमानतळ, रेल्वे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. भविष्यातील वाहतुकीचा विचार करून आजच आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे आहे,” असेही मोहोळ यांनी सांगितले.
या उड्डाणपुलाच्या कामाशी आपला पूर्वीपासून असलेला संबंध अधोरेखित करताना मोहोळ म्हणाले, “महापालिकेच्या स्थायी समितीची धुरा माझ्याकडे असताना या उड्डाणपुलाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महापौर म्हणून काम करत असताना त्याच्या प्रक्रियेला पुढे नेण्याची संधी मिळाली आणि आज केंद्रीय मंत्री म्हणून त्याचे लोकार्पण करण्याचा योग आला, ही माझ्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे. एका प्रकल्पाची संकल्पना प्रत्यक्षात येऊन तो नागरिकांच्या सेवेत दाखल होताना पाहणे हा निश्चितच आनंदाचा क्षण आहे.”

पुण्याच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्याची गरज आहे. पुणे शहराचा विस्तार वेगाने होत असताना केवळ पारंपरिक रस्ते रुंदीकरणावर अवलंबून न राहता उड्डाणपूल, भुयारी मार्ग, मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक पर्यायांचा एकत्रित विचार करावा लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारकडून पुण्याच्या पायाभूत विकासाला विशेष चालना मिळत असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून पुण्याला भविष्यातील गरजांसाठी सक्षम करण्याचे काम सुरू आहे.
“पुणे हे देशातील महत्त्वाचे शिक्षण, आयटी, उद्योग आणि सेवा क्षेत्राचे केंद्र आहे. त्यामुळे पुण्याचा विकास आणि वाहतूक व्यवस्था यांचा मेळ साधणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांचा वेळ, इंधन आणि श्रम वाचवणारी, तसेच शहराच्या विकासाला गती देणारी पायाभूत सुविधा उभारणे हेच आमचे उद्दिष्ट आहे,” असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.या लोकार्पण सोहळ्यास आमदार चेतन तुपे, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, शिवसेनेचे पक्ष नेते नितीन गावडे यांच्यासह स्थानिक नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते.