पुणे : पुणे कँटोन्मेंट मतदारसंघाचे भाजपा उमेदवार सुनिल कांबळे यांची २०२४ सालच्या विधानसभा निवडणुकीत झालेली निवड रद्द करावी या मागणीसाठी कांग्रेसचे उमेदवार माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांनी दाखल केलेली निवडणुक याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने दि १२ ऑगस्ट २०२६ रोजी हा आदेश पारित केला आहे.
निवडणुक आयोगाने मतदान हे वोटिंग मशीनद्वारे घेतले जाणार याची पूर्वसुचना प्रसिद्ध केली नव्हती म्हणुन ही निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी याचिका कर्त्यांतर्फे करण्यात आली होती. ‘परंतु असे नोटिफिकेशन काढावे असे लोक प्रतिनिधित्व कायद्यात कुठेही नमूद करण्यात आले नाही’ असा युक्तिवाद प्रतिवादींतर्फे करण्यात आला व तो ग्राह्य धरून उच्च न्यायालयाने सदरची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच “लोकप्रतिनिधित्व कायद्या प्रमाणे एखाद्या उमेदवाराने निवडणूक लढवताना ‘भ्रष्ट आचरण केल्याचा’ आरोप करताना त्याचे सर्व तपशील सादर करणे आवश्यक असते, असे सविस्तर तपशील नसतील तर ती निवडणुक याचिका फेटाळण्यास पात्र आहे” असा निष्कर्ष उच्च न्यायालयाने या निकालात काढला आहे.
‘ईव्हीएम मशीनच्या बाबतीत घेतलेले आक्षेप स्वीकारार्ह नाहीत, उमेदवाराच्या अतिरिक्त खर्चाबाबत केलेल्या आरोपांबाबत तपशील सादर केलेले नाहीत व एकंदर याचिकेतील आक्षेप हे झालेल्या मतदानावर लक्षणीय परिणाम करणारे होते असे दिसत नसल्याने सदरची याचिका फेटाळून लावली आहे.’- अॅड. अतुल पाटील या प्रकरणात आमदार सुनिल कांबळे यांच्या वतीने अॅड. बाळकृष्ण जोशी आणि अॅड. अतुल पाटील आणि अॅड. विरेन पेठकर यांनी बाजू मांडली.