हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक दारूच्या नशेत शाळेत वावरत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने अखेर कारवाई केली आहे. मुख्याध्यापक विनोद कटके यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले आहेत.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानादरम्यान हा प्रकार समोर आला होता. दिपके यांनी लिंबाळा येथील शाळेला भेट देऊन शाळेतील परिस्थितीची पाहणी केली होती. यावेळी मुख्याध्यापक शाळेच्या परिसरात दारूच्या नशेत असल्याचा तसेच वर्गात झोपल्याचा व्हिडीओ समोर आणण्यात आला होता. या प्रकारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी दिपके यांनी केली होती.
कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर दिपके हिंगोलीत दाखल होण्यापूर्वीच संबंधित मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, मुख्याध्यापकाचे निलंबन झाल्यानंतरही दिपके यांनी आंदोलन मागे घेतलेले नाही.
लिंबाळा शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याचा मुद्दा उपस्थित करत शाळेला नवीन चार शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी दिपके यांनी केली आहे. जोपर्यंत शिक्षक देण्याबाबत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
दरम्यान, शिक्षण अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत लेखी आश्वासन देण्याचे सांगितल्याची माहिती आहे. त्यानंतर अभिजीत दिपके यांनी शाळेची पाहणी सुरू केली.
नेमकं प्रकरण काय?
लिंबाळा गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक विनोद कटके हे शाळेच्या आवारात दारू पित असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला होता. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर प्रकरणाची चर्चा सुरू झाली. व्हिडीओमध्ये मुख्याध्यापक दारूची बाटली घेऊन शाळेच्या परिसरात फिरताना आणि वर्गात झोपल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्याचवेळी शाळेत विद्यार्थी उपस्थित असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत होते.
या घटनेनंतर संबंधित मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी जोर धरू लागली. अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली असली, तरी आता शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या मागणीवरून अभिजीत दिपके आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे लिंबाळा शाळेतील या प्रकरणाला आता नवा वळण मिळाले आहे.