पुणे : विद्यार्थ्यांचे प्रश्न, रोजगाराच्या संधी आणि तरुणांच्या भवितव्याशी संबंधित मुद्द्यांना व्यासपीठ देणारी ‘छात्रों की गूंज, देश की गूंज’ ही देशव्यापी युवा जनसंवाद मोहीम आता पुण्यात दाखल होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेचा विशेष कार्यक्रम २२ ऑगस्ट रोजी AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथे होणार आहे.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच संपूर्ण प्रेक्षकवर्ग मुलींचा असणार आहे. तरुणींना भेडसावणारे शिक्षण, रोजगार, समान संधी, सुरक्षितता, स्वावलंबन, प्रतिनिधित्व तसेच भविष्यातील आकांक्षा यांसारखे प्रश्न यावेळी केंद्रस्थानी असतील.कार्यक्रमात असीस कौर, सानिया MQ आणि Team DanceX यांचे लाइव्ह परफॉर्मन्स होणार असून, त्यानंतर राहुल गांधी यांच्याशी तरुणींचा थेट संवाद आणि त्यांचे मार्गदर्शन होणार आहे.
या मोहिमेला १७ जून रोजी कोटा येथून सुरुवात झाली. कोटा येथे शिक्षण व्यवस्था, पेपरफुटी आणि परीक्षेतील अनियमिततेचे प्रश्न मांडण्यात आले. त्यानंतर देहरादून आणि प्रयागराज येथेही कार्यक्रम झाले. विविध ठिकाणी परवानग्या आणि कार्यक्रमस्थळांबाबत अडचणी निर्माण झाल्या असतानाही मोहिमेला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिक्षणाच्या प्रश्नांपासून रोजगाराच्या संधींपर्यंत आणि आता तरुणींच्या प्रश्नांपर्यंत विस्तारलेली ही मोहीम पुण्यात कोणते मुद्दे पुढे आणते, याकडे युवा वर्गाचे लक्ष लागले आहे.