पुणे : पुण्यातील नवले पुलाजवळ अपघातांची मालिका सुरूच असून, आज पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली. पुलाच्या तीव्र उतारावर एकापाठोपाठ तब्बल ५ ते ६ वाहने एकमेकांवर आदळली. या धडकेत एका रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ती अक्षरशः चक्काचूर झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
नेमका अपघात कसा घडला?
प्राथमिक माहितीनुसार, नवले पुलाच्या उतारावर एका भरधाव वाहनाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज आहे. नियंत्रण सुटलेल्या वाहनाने पुढे जाणाऱ्या वाहनांना जोरदार धडक दिली. त्यानंतर एकामागून एक वाहने एकमेकांवर आदळत गेल्याने काही क्षणांतच वाहनांची साखळी तयार झाली.
या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून, इतर वाहनांचेही नुकसान झाले आहे. धडकेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे काही काळ घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
वाहतूक काही काळ विस्कळीत
अपघातामुळे नवले पुलाच्या परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम करण्यात आले.
वाहनांचा वेग आणि झालेली मोठी हानी पाहता हा अपघात अत्यंत गंभीर होता. मात्र, सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बचावल्याने मोठी जीवितहानी टळली. नवले पुलावरील अपघातांचे वाढते प्रमाण पाहता या मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.