सातारा : नॉटिंगहॅम विद्यापीठ, इंग्लंड येथील रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे सहयोगी प्राध्यापक डॉ. निखिल अजित देशपांडे यांनी सातारा येथील शैक्षणिक संस्थांना भेट देऊन विद्यार्थी, प्राध्यापक आणि विभागप्रमुखांशी संवाद साधत एआय आणि रोबोटिक्स क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान, संशोधन आणि भविष्यातील संधींबाबत मार्गदर्शन केले.दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सातारा येथील यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या टेक्निकल कॅम्पस, वाढे येथे डॉ. देशपांडे यांचे विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. रोबोटिक्स, एआय आणि मेकॅट्रॉनिक्स शाखेतील विद्यार्थ्यांना त्यांनी या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, संशोधनाच्या दिशा तसेच भविष्यातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.
यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.दशरथ सगरे,सचिव डॉ.अजिंक्य सगरे,प्राचार्य डॉ.पाटील,विभागप्रमुख डॉ.अजय जगताप,कुलसचिव डॉ.गणेश सुरवसे यांच्यासह विद्यार्थी,प्राध्यापक उपस्थित होते. या भेटीदरम्यान डॉ. देशपांडे यांनी विविध विभागांच्या सर्व विभागप्रमुखांशी संवाद साधून शैक्षणिक अभ्यासक्रम, संशोधन, उद्योगाभिमुख शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत चर्चा केली. यशोदा शिक्षण संस्थेतील रोबोटिक्सच्या प्रात्यक्षिकांची पाहणी करून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे आणि तांत्रिक उपक्रमांचे कौतुक केले तसेच त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.
मूळचे पुण्याचे असलेले डॉ. निखिल देशपांडे हे नॉटिंगहॅम विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागात कार्यरत असून ‘सायबर-फिजिकल हेल्थ अँड असिस्टिव्ह रोबोटिक्स टेक्नॉलॉजीज’ या संशोधन समूहाचे उपप्रमुख आहेत. रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील १७ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या डॉ. देशपांडे यांचे संशोधन प्रामुख्याने आरोग्य, वैद्यकीय सेवा आणि प्रशिक्षण तंत्रज्ञानावर केंद्रित आहे.शस्त्रक्रियेसाठी सहाय्यक रोबोटिक्स, दूरस्थ रोबोट नियंत्रण, पुनर्वसनासाठी एआय आधारित प्रणाली तसेच विशेष कौशल्यांच्या प्रशिक्षणासाठी रोबोटिक्स आणि मिश्र-वास्तव तंत्रज्ञान यावर ते संशोधन करतात. रोबोट मॅनिप्युलेशन, यांत्रिक रचना, मशीन लर्निंग आणि संगणकीय दृष्टी या क्षेत्रांतही त्यांचे विशेष प्रावीण्य आहे.डॉ. निखिल देशपांडे यांनी २०१२ मध्ये अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीमधून रोबोटिक्स विषयात पीएचडी प्राप्त केली. त्यापूर्वी २००३ मध्ये पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी पूर्ण केली.
दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ॲाफ सायन्स एज्युकेशन आणि रिसर्च ,बाणेर रोड येथे डॅा निखिल देशपांडे यांनी संस्थेचे अध्यक्ष,संचालक डॅा अरविंद नातू यांच्यासोबत संस्थेतील विविध विभागात सुरू असलेल्या कामांची माहिती करून घेतली आणि संस्थेत कार्यरत वैज्ञानिकांशी,संशोधन करीत असलेल्या विद्यार्थ्यांशी आणि प्राध्यापकांशी सविस्तर चर्चा केली.दि.२० ऑगस्ट रोजी पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ इंजिनिअरिंग कॉलेज, कर्वेनगर, अभिनव शिक्षण संस्थेचे इंजिनिअरिंग कॉलेज, नऱ्हे येथेही त्यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधला.
एआय आणि रोबोटिक्स क्षेत्रात वेगाने होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर डॉ. देशपांडे यांच्या या संवादातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या विविध उपयोगांची, संशोधनाच्या नव्या दिशांची आणि भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक संधींची माहिती मिळाली. विशेषतः रोबोटिक्स, एआय आणि मेकॅट्रॉनिक्ससारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी संशोधन आणि नवोन्मेषाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.