पुणे : पुण्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कथित आध्यात्मिक गुरू म्हणून वावरणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने एका २२ वर्षीय तरुणीला नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे आमिष दाखवत तिच्याकडे अर्धनग्न फोटो मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मोटिव्हेशनल स्पीकर असल्याचा दावा
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दिव्य जितेंद्र परमार (वय २३) असे आहे. आरोपी स्वतःला मोटिव्हेशनल स्पीकर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळख निर्माण करत होता. सोशल मीडियावर त्याचे चॅनेल असून, त्याच्या माध्यमातून तो विविध विषयांवर मार्गदर्शन आणि व्याख्याने देत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे आमिष
फिर्यादी तरुणीशी आरोपीची गेल्या काही महिन्यांपासून ओळख होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद वाढल्यानंतर आरोपीने स्वतःला आध्यात्मिक गुरू म्हणून तिच्यासमोर सादर केले. शारीरिक हालचाली आणि काही विशिष्ट पद्धतींच्या माध्यमातून शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर करता येते, असा दावा त्याने केला.
यानंतर त्याने तरुणीकडे तिच्या शरीराची प्रगती पाहण्यासाठी तसेच नकारात्मक ऊर्जा दूर करण्याच्या प्रक्रियेसाठी अर्धनग्न फोटो पाठवण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने अखेर कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मोबाईल आणि लॅपटॉप पोलिसांकडून जप्त
तरुणीच्या तक्रारीनंतर कोंढवा पोलिसांनी आरोपीला अटक केली. तपासादरम्यान आरोपीचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला असून, त्यातील संदेश, फोटो, व्हिडिओ आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू आहे. आरोपीने अशाच प्रकारे आणखी कोणाला संपर्क केला होता का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यान्वयेही कारवाई
या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.या प्रकरणामुळे सोशल मीडियावर आध्यात्मिक गुरू, मोटिव्हेशनल स्पीकर किंवा इन्फ्लुएन्सर म्हणून वावरणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवताना नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.