पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, पौड रोड, पुणे-३८ येथील अध्यापन, अध्ययन व मूल्यमापन समिती (टीएलई) आणि रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि दैनंदिन जीवन या विषयावरील विशेष व्याख्यान संपन्न झाले. यावेळी प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी, प्रमुख पाहुणे म्हणून राहुल शहा, क्रांती शहा, वृषाली देशपांडे, प्रशांत देशपांडे,श्रीनिवास जानू, डॉ प्रकाश हुंबाड, डॉ श्रीनिवास ईपलपल्ली, डॉ सपना राणे, डॉ आदिनाथ पाठक, डॉ.शोभा तितर उपस्थित होते.
यावेळी राहुल शहा म्हणाले कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना केवळ तंत्रज्ञानापुरती मर्यादित नसून ती आज आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनल्याचे नमूद केले. मोबाईल फोनमधील व्हॉईस असिस्टंट, समाजमाध्यमांवरील शिफारशी, ऑनलाइन खरेदी, बँकिंग व्यवहार, आरोग्यसेवा तसेच शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर याबाबत त्यांनी विविध उदाहरणांसह विद्यार्थ्यांना माहिती दिली. पुढे बोलताना त्यांनी नैतिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एथिकल एआय) या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले. तंत्रज्ञानाचा वापर करताना डेटा गोपनीयता, पूर्वग्रहरहित निर्णयप्रक्रिया आणि पारदर्शकता या बाबी किती महत्त्वाच्या आहेत, याबाबत त्यांनी सविस्तर विवेचन केले.
यानंतर रोटेरियन क्रांती शहा (जिल्हा संचालक, रोटरी एआय सर्व्हिस) यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणात त्यांनी रोटरी क्लबतर्फे समाजातील विविध स्तरांवर कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत जनजागृती करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी यांनी मार्गदर्शन करताना म्हणाल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचे विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यातील नवीन उपलब्ध झालेल्या संधी शोधाव्या असे आवाहन केले. प्रा. रजनी इंगोले यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत एखंडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ.शर्मिला चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अशोक शेळके, प्रा. रजनी इंगोले, प्रा. अक्षदा हुंबे, प्रा. निलम ढगारे, प्रा. कृष्णा शिंदे, प्रा. एखंडे प्रशांत आणि श्री आशिष परमार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.