नागपूर : सहा वर्षांपूर्वीच्या कोव्हिड महामारीने अनेकांच्या आयुष्याला कधीही न भरून निघणाऱ्या जखमा दिल्या. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. कुणी आयुष्याचा सच्चा साथीदार गमावला, तर कुणाच्या आयुष्याची सुंदर स्वप्नच धुळीस मिळाली. अनेक भगिनींच्या आयुष्यावर अंधाराची छाया पसरली. अशाच संकटातून मोठ्या हिमतीने उभ्या राहिलेल्या प्रीतीच्या आयुष्यात गुरुवारी नव्या पर्वाची सुरुवात झाली. संकटाच्या काळात तिचे पालकत्व स्वीकारणाऱ्या ‘सोबत पालकत्व फाऊंडेशन’ च्या पुढाकाराने प्रीतीने शिवमसिंग ठाकूर यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. माजी आमदार संदीप जोशी आणि देवयानी जोशी यांनी तिचे कन्यादान केले. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ह्रद्य विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्याला भावी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
लक्ष्मीनगर येथील राणी लक्ष्मी सभागृह येथे या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार संजय भेंडे, महापौर नीता ठाकरे, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी- वखरे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह ‘सोबत पालकत्व फाऊंडेशन’चे अध्यक्ष व माजी आमदार संदीप जोशी आणि देवयानी जोशी आदी उपस्थित होते.
कोव्हिडच्या काळातील त्या भयाण दिवसांमध्ये आपल्या पतीचा जीव वाचविण्यासाठी प्रीती ही रेमडेसिव्हिर औषधाच्या शोधात होती. पण, सारे प्रयत्न अपयशी ठरले आणि तिने आयुष्याचा साथीदार गमावला. आपल्या दोन चिमुकल्यांसह नव्याने आयुष्य उभे करण्याचे मोठेच आव्हान तिच्यापुढे उभे ठाकले होते. पण, कदाचित नियतीने तिच्या आयुष्याची कहाणी तिथेच संपविलेली नव्हती. माजी आमदार संदीप जोशी व देवयानी जोशी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘सोबत पालकत्व प्रकल्पा’ने तिला मदतीचा हात दिला.
या प्रकल्पाच्या माध्यमातून केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर पालकत्वाचा आधार तिला मिळाला. रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन उभे राहिलेले हे पालकत्व काळाच्या प्रवाहासह अधिक घट्ट होत गेले. प्रीतीच्या आयुष्याला या नव्या आई-बाबांनी केवळ आधारच दिला नाही, तर तिच्या आयुष्यातील पुढचा महत्त्वाचा टप्पाही आपल्या मुलीप्रमाणे साजरा केला. ज्या व्यक्तीने त्या कठीण काळात तिच्या पतीसाठी रेमडेसिव्हिर मिळवून देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला, त्याच व्यक्तीने नंतर तिच्या आयुष्याला साथ देण्यासाठीही आपला हात पुढे केला. प्रितीसह तिच्या दोन मुलांचाही स्वीकार करण्याचे वचन त्याने दिले. प्रीतीच्या आयुष्याला स्थैर्य मिळावे आणि तिला नव्याने संसार थाटता यावा, यासाठी तिच्या विवाहाची जबाबदारी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आली. त्यामुळे हा विवाह केवळ दोन व्यक्तींना वैवाहिक बंधनात जोडणारा सोहळा न राहता, संकटाच्या काळात माणुसकीने दिलेल्या आधारातून एका नव्या आयुष्याला मिळालेली सुरुवात ठरला. कोव्हिड काळातील दु:खातून सुरू झालेल्या या प्रवासात संदीप आणि देवयानी जोशी यांनी स्वीकारलेले पालकत्व, प्रीतीचा विवाह आणि नवदाम्पत्याला मिळालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आशीर्वाद, या साऱ्यांनी त्या प्रवासाला एक भावस्पर्शी किनार लाभली होती.
या सोहळ्याचे आत्मिक समाधान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कोव्हिडच्या काळात घरातील कर्ता पुरूष गमावल्याने अनेक महिलांचे भवितव्य अंधःकारमय झाले. त्यावेळी सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून संदीप जोशी पुढे आले. जवळपास २९३ परिवारांची नोंदणी झाली. यापैकी शंभर परिवारांचे पालकत्व मी स्वीकारले. कोव्हिडपासून आजपर्यंत त्यांनी शिक्षण तसेच इतर गोष्टींकडे लक्ष दिले. आज त्यापैकी एका एकल मातेचा विवाह झाला आहे. पुढील काळात जवळपास ३०० मुलींचा विवाह होईपर्यंत ही जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. आज प्रीतीच्या विवाहामुळे तिच्या जीवनात एक प्रकारचे स्थैर्य येत असल्याचे आत्मिक समाधान आहे. याचा एक वेगळाच आनंद असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विवाह सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.कोव्हिडच्या संकटानंतरही आयुष्य थांबत नाही, तर योग्य वेळी मिळालेला आधार एखाद्याला पुन्हा उभे राहण्याचे बळ देऊ शकतो, याची जाणीव या विवाह सोहळ्याने करून दिली.