छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी हृदयद्रावक घटना घडली. डोंगरावरून खाली जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या १८ वर्षीय मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवळाई-सातारा परिसरातील कुणाल मुरलीधर चांदवडे हा १८ वर्षीय तरुण सकाळी खवड्या डोंगरावर गेला होता. त्याला धोकादायक परिस्थितीत पाहिल्यानंतर कुटुंबीयांना याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याचे आई-वडील तसेच स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानही तातडीने दाखल झाले.
कुणालला समजावून सांगण्याचे प्रयत्न बराच वेळ सुरू होते. त्याचे वडील मुरलीधर चांदवडे यांनीही मुलाला सुरक्षितपणे मागे आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि कुणाल खाली पडला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मुरलीधर यांचाही तोल गेला आणि तेही खाली पडले. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला.
ही घटना डोळ्यांसमोर घडल्याने आई संगीता चांदवडे यांनाही मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. कुणाल मुरलीधर चांदवडे, मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी मृतांची नावे आहेत.
या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. कुणालने हा टोकाचा निर्णय का घेतला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत