सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘सायकल शिकवतो’ म्हणत चिमुकलीला शेतात नेलं; पिंपळवंडीत अत्याचारानंतर हत्या, ग्रामस्थांचा संताप
  • नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
 क्राईम

डोंगरावर तीन तास सुरू होती मुलाची मनधरणी; कुणालला वाचवताना आई-वडिलांनीही गमावला जीव, तिसगाव हादरलं

डिजिटल पुणे    21-08-2026 15:30:57

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. डोंगराच्या कड्यावर गेलेल्या १८ वर्षीय कुणाल मुरलीधर चांदवडे याला वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या त्याच्या आई-वडिलांचाही दुर्घटनेत मृत्यू झाला. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांनीही जीव गमावल्याने चांदवडे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. कुणाल मुरलीधर चांदवडे (१८), मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास कुणाल खवड्या डोंगरावर पोहोचला होता. तो डोंगराच्या कड्यावर बराच वेळ उभा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे आई-वडील घटनास्थळी दाखल झाले. मुलाला सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी त्यांनी त्याच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. दरम्यान, तिसगावमधील ग्रामस्थांसह पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले.

तब्बल तीन तास सुरू होता समजावण्याचा प्रयत्न

कुणाल जवळपास तीन तास डोंगराच्या कड्यावर असल्याचे सांगण्यात येते. तो वारंवार आपली जागा बदलत होता. त्यामुळे त्याच्याजवळ जाणेही धोकादायक ठरत होते. मात्र, आई त्याच्याशी सतत बोलत होती आणि ग्रामस्थही त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते.

“तू असं करून काय होणार आहेस? आईकडे बघून तरी जग,” अशा शब्दांत ग्रामस्थांनी कुणालला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याला शांत करण्यासाठी विविध पद्धतीने संवाद साधला जात होता. तिसगावचे सरपंचही घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यांनी कुणालशी बोलण्याचा प्रयत्न केला.

“आयफोन 15 प्रो देतो...” सरपंचांची विनवणी

कुणाल कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सरपंचांनीही त्याला भावनिक पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला. “हे बघ, मी गावचा सरपंच आहे. माझ्याकडे मोबाईल आहे. तुला आयफोन 15 प्रो देतो,” अशी विनवणी त्यांनी कुणालला केल्याचे सांगण्यात येते.

मात्र, या आश्वासनानंतरही कुणालची मनःस्थिती बदलली नाही. तो काही क्षण गुडघ्यात वाकून हताश झाल्यासारखा दिसला. त्यानंतर त्याने, “आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन आहे,” असे म्हटल्याचे सरपंचांनी सांगितले.

आईने रडत मुलाला समजावले

कुणालचे हे शब्द ऐकल्यानंतर त्याच्या आईनेही त्याला भावनिक आवाहन केले. “दुसरं सोल्यूशन नाही, असं का वाटतं तुला?” असे म्हणत तिने मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला. आईचा आवाज ऐकूनही कुणालची मनःस्थिती बदलली नाही. दरम्यान, परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याने घटनास्थळी उपस्थित असलेले सर्वजण त्याला सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी प्रयत्न करत होते.

शेवटच्या काही मिनिटांत वडील मुलाजवळ गेले

सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणालचे वडील सुरुवातीला डोंगराच्या खाली होते. तर आई वर उभी राहून मुलाशी संवाद साधत होती. जवळपास तीन तासांच्या प्रयत्नांनंतर शेवटच्या १५ ते २० मिनिटांत वडीलही वर गेले. मुलाला बोलण्यात गुंतवून त्याला सुरक्षितपणे पकडता येईल, अशी अपेक्षा होती.

मात्र, कुणालला पकडण्याचा प्रयत्न करत असताना वडिलांचा तोल गेला आणि दोघेही डोंगरावरून खाली पडले. त्यानंतर मुलाच्या दिशेने धाव घेत असताना आईचाही तोल गेला आणि तीही खाली पडली. उंचावरून पडल्याने तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेने तिसगाव परिसरात शोककळा

एकाच कुटुंबातील आई, वडील आणि मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने तिसगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एका कुटुंबाचा आधारच हिरावला गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी पुढील कार्यवाही सुरू केली असून, या दुर्दैवी घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी आणि कुणालची मानसिक अवस्था याबाबत तपास केला जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती