सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘सायकल शिकवतो’ म्हणत चिमुकलीला शेतात नेलं; पिंपळवंडीत अत्याचारानंतर हत्या, ग्रामस्थांचा संताप
  • नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
 शहर

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ(एमकेसीएल)ची रौप्यमहोत्सव पूर्ती ; २३ ऑगस्टला मुंबईत विशेष समारंभ

डिजिटल पुणे    21-08-2026 17:26:59

पुणे:  महाराष्ट्रातील युवा पिढीला  आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञान, कौशल्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित अर्थात एमकेसीएलच्या रौप्यमहोत्सव पूर्ती   समारंभाचे आयोजन रविवार,दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर(नरिमन पॉईंट) येथे सकाळी साडेदहा वाजता करण्यात आले आहे.एमकेसीएलच्या जडणघडणीत  भरीव योगदान दिलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेष कृतज्ञता सोहळ्याचेही आयोजन या समारंभात  करण्यात आले आहे. तसेच कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्याच्या दिशेने दिलेल्या दिशादर्शक नेतृत्वाबद्दल पद्मश्री प्रतापराव  पवार यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.दिवसभर तीन सत्रात चालणाऱ्या या  रौप्यमहोत्सव पूर्ती   समारंभात   परिसंवाद,पुस्तक प्रकाशने,व्याख्याने आणि विविध लोकोपयोगी गोष्टींच्या लोकार्पणाचा समावेश आहे. उदघाटन सत्राचा मुख्य कार्यक्रम दीड वाजेपर्यंत चालणार आहे. 

 महाराष्ट्राचे माहिती-तंत्रज्ञान मंत्री आशीष  शेलार, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि एमकेसीएलचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर हे समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.महाराष्ट्र ज्ञान महामंडळचे चीफ मेंटॉर विवेक सावंत,व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.या कार्यक्रमाला प्रवेश निमंत्रितांसाठी आहे. 

कार्यक्रमात एमकेसीएल च्या नूतन आविष्कारांचे चे अनावरण  मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्यात 'एमकेसीएल क्रांती','एआय असिस्टेड इंटर्नशिप फ्रेमवर्क','लर्न लाइव्ह','पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ऍग्री आंत्रप्रेन्युअरशिप','महा एआय मास्टरक्लास','व्हिजन डॉक्युमेंट फॉर हायब्रीड फ्युचर ऑफ हायर एज्युकेशन' चा समावेश आहे.'कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचे उपयोजन'या विषयावर प्रतापराव  पवार यांचे व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले आहे.'जीवघेण्या शेतीकडून समृद्ध शेतीकडे','संगणक साक्षरतेकडून सार्थकतेकडे' या पुस्तकांचे प्रकाशन तसेच इंडियन डिजिटल फाईन आर्टस् 'चे अनावरण करण्यात येणार आहे. एमकेसीएल पेटंट्सची घोषणा करण्यात येणार आहे.एमकेसीएलचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील,माजी अध्यक्ष राजेश टोपे हेही मार्गदर्शन करणार असून डॉ.अनिल काकोडकर पहिल्या सत्राचा अध्यक्षीय समारोप करणार आहेत.

दुपारच्या सत्रात सव्वा दोन वाजता 'बिल्ड एआय' विषयावर परिसंवाद होणार असून त्यात नीलेश मोडक,चिन्मय गवाणकर,डॉ.आशीष तेंडुलकर यांच्याशी विनायक पाचलग संवाद साधतील.डॉ.अजित रानडे अध्यक्षस्थानी असतील.साडेतीन वाजता तिसऱ्या सत्रात काही मनोगते आणि एमकेसीएल प्रोडक्ट्स चे अनावरण करण्यात येणार आहे.

२० ऑगस्ट २००१ रोजी स्थापना झालेल्या एमकेसीएलने गेल्या २५ वर्षांत राज्यातील डिजिटल शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. एमएस-सीआयटीसह विविध डिजिटल शिक्षण उपक्रम, कौशल्यविकास कार्यक्रम, नवोपक्रम, उत्साह आणि ऊर्जा यांच्या माध्यमातून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान पोहोचविण्याचे काम संस्थेने केले आहे.राज्यातील कानाकोपऱ्यात उभारण्यात आलेल्या सुमारे ३६०० ई-प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा लाभ मिळत असून, या माध्यमातून महाराष्ट्राला आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य एमकेसीएलकडून सुरू आहे.एमकेसीएलच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीचा आढावा घेताना भविष्यातील डिजिटल शिक्षण, कौशल्यविकास, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ज्ञानाधारित विकासाला अधिक गती देण्याच्या दिशेने संस्थेच्या आगामी वाटचालीची रूपरेषा या निमित्ताने अधोरेखित होणार आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती