सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ‘सायकल शिकवतो’ म्हणत चिमुकलीला शेतात नेलं; पिंपळवंडीत अत्याचारानंतर हत्या, ग्रामस्थांचा संताप
  • नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
 राज्य

राहुल गांधी साहिलला घेऊन थेट पोलीस ठाण्यात; पेलेट गन प्रकरणी FIRची मागणी, नोंद न झाल्याने ठिय्या

डिजिटल पुणे    21-08-2026 17:29:51

दिल्ली : जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पेलेट गनच्या वापराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी पेलेट गनच्या माऱ्यात जखमी झालेल्या विद्यार्थी साहिल लोचाब याला सोबत घेऊन संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.

जंतर-मंतर येथे २० जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी पेलेट गनचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. या कारवाईत साहिल लोचाब जखमी झाला असून त्याच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर एम्सच्या जयप्रकाश नारायण एपेक्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार करण्यात आल्याची माहिती आहे.

राहुल गांधी यांनी यापूर्वीही संसदेत आणि पत्रकार परिषदेत पेलेट गनच्या वापराचा मुद्दा उपस्थित केला होता. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांकडून स्पष्टीकरणाची मागणी करत त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले होते. मात्र, सत्ताधारी पक्षाने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या देत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

साहिल हा दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगमध्ये शिक्षण घेत असल्याचे सांगितले जाते. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, पेलेट गनच्या माऱ्यामुळे त्याच्या उजव्या डोळ्याच्या दृष्टीवर गंभीर परिणाम झाला आहे. या घटनेमुळे विद्यार्थी आंदोलनातील पोलिसांच्या कारवाईवर पुन्हा राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

दरम्यान, संसदेत पेलेट गनच्या वापरावरून राहुल गांधी आणि सत्ताधारी पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. राहुल गांधी यांनी केलेल्या काही वक्तव्यांवर आक्षेप घेत ती असंसदीय असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे जंतर-मंतर आंदोलन, पेलेट गनचा वापर आणि साहिलच्या तक्रारीवरून दिल्लीतील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.


 Give Feedback



 जाहिराती