पुणे : पुणे शहराची वाहन क्रमांकातील ओळख असलेला ‘MH-12’ कायम राहणार असला, तरी नव्या वाहनांच्या नोंदणीसाठी सध्या ‘MH-61’ या मालिकेचा वापर केला जाणार आहे. ‘MH-12 1A’ ही प्रस्तावित मालिका सुरू करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील सध्याच्या वाहन क्रमांक मालिका संपत आल्याने ‘MH-12 1A’ ही नवीन मालिका सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वी मंत्रालयाकडून अधिसूचना प्रसिद्ध करणे आणि त्यावर हरकती मागविणे आवश्यक आहे.
या प्रक्रियेसाठी नियमानुसार ४५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर क्रमांक मालिकेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे ‘MH-12 1A’ मालिका प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान, नवीन वाहनांच्या नोंदणीमध्ये अडथळा निर्माण होऊ नये आणि वाहनधारकांची गैरसोय टाळता यावी, यासाठी परिवहन विभागाने ‘MH-61’ ही तात्पुरती व्यवस्था केली आहे. सोमवार, २४ ऑगस्टपासून पुण्यातील नव्या वाहनांना ‘MH-61’ क्रमांक मालिकेत नोंदणी मिळणार आहे.
‘MH-12 1A’ मालिका सुरू झाल्यानंतर सध्या ‘MH-61’ अंतर्गत नोंदणी झालेल्या वाहनांच्या क्रमांकात बदल करण्याची प्रक्रिया करावी लागण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया वाहनधारकांसाठी वेळखाऊ तसेच खर्चिक ठरू शकते.
पुण्याची पारंपरिक ओळख असलेला ‘MH-12’ क्रमांक कायम ठेवण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. त्यामुळे ‘MH-12’ ही ओळख कायम राहणार असली, तरी प्रस्तावित ‘MH-12 1A’ मालिकेसाठी पुणेकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
‘MH-61’ ही तात्पुरती व्यवस्था
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, ‘MH-61’ हा क्रमांक कायमस्वरूपी पर्याय नसून ‘MH-12 1A’ मालिका सुरू होईपर्यंतची तात्पुरती व्यवस्था आहे. त्यामुळे या कालावधीत नवीन वाहनांची नोंदणी ‘MH-61’ अंतर्गत केली जाणार आहे.