पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाची 'अंमली पदार्थ विरोधी समन्वय समिती', युथ रेड क्रॉस युनिट आणि 'रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल' यांच्या संयुक्त विद्यमाने, तरुणांना अंमली पदार्थांच्या सेवनापासून परावृत्त करण्यासाठी "Be Smart, Don’t Start" समंजस बना, सुरुवातच करू नका या विषयावर एका विशेष जनजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे रो.आनंद कुलकर्णी, डॉ. सुमेधा भोसले, रो. वृषाली देशपांडे (अध्यक्ष), रो. क्रांती शहा, रो. प्रशांत देशपांडे आणि प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी,प्रा.संतोष मोरे,डॉ.रुपाली शेंडकर उपस्थितीत होते.प्रा.अभिजित शिंदे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली आणि प्रा. डॉ. रूपाली शेंडकर यांनी प्रास्ताविक केले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना रो. आनंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या विळख्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, तरुण वयात अनेक विद्यार्थी मित्रपरिवाराचा दबाव आणि कुतूहल यांमुळे व्यसनाच्या आहारी जातात; परंतु एकदा का व्यसन जडले की त्यातून मुक्त होणे अत्यंत कठीण असते. म्हणूनच प्रत्येकाने " समंजस बना, सुरुवातच करू नका " हा मंत्र अंगीकारला पाहिजे.मानसिक तणाव, नैराश्य किंवा भावनिक अस्थिरता अनेक लोकांना व्यसनाकडे वळवते; त्यामुळे योग्य भावनिक व्यवस्थापन, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास हेच यापासून वाचण्याचे खरे उपाय आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना 'नाही' म्हणण्याची कला, ध्यानधारणा, खेळ आणि विविध छंद यांसारखे सकारात्मक पर्याय स्वीकारण्याचा सल्ला दिला.
प्रमुख पाहुण्या डॉ. सुमेधा भोसले यांनी शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्य यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असतो, असे सांगत त्यांनी नमूद केले की नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती यांच्या मदतीने तणाव व नैराश्य यांसारख्या समस्यांवर नैसर्गिकरित्या मात करता येते. आपल्या अध्यक्षीय मनोगत प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी यांनी आजच्या स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण काळात तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवणे ही केवळ महाविद्यालयाचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे, असे त्या म्हणाल्या. अभ्यासासोबतच मानसिक आरोग्याकडेही लक्ष देण्याचा आणि कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता योग्य निर्णय घेण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
उपक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली समिती प्रमुख डॉ. अशोक शेळके, डॉ. हिमालय सकट, प्रा. संतोष मोरे, डॉ. रूपाली शेंडकर, प्रा. अरुण शिंदे, प्रा. नरेंद्र केदारी, डॉ. नानासाहेब पवार, प्रा. अभिजीत शिंदे आणि श्री. आशिष परमार, श्री.संजय कुंभार यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.