सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 विश्लेषण

मराठीवरील प्रभुत्व, निस्सीम प्रेमाचा उत्तुंग आदर्श ;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रा. यास्मिन शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली

डिजिटल पुणे    24-08-2026 14:42:25

मुंबई : मराठीवरील प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी, व्याकरण तज्ज्ञ, भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा. यास्मिन शेख यांचे निधन शोकदायी असल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, प्रा. शेख यांचा जीवनप्रवास मराठीच्या प्रेमाने भारलेला होता. एखाद्या भाषा शिक्षकाने त्या भाषेवर किती निखळ, प्रांजळ प्रेम करावे याचे प्रा. शेख मूर्तीमंत उदाहरण ठरल्या. शिक्षिका, लेखिका, भाषा शास्त्रातील संशोधन आणि अभ्यासक या नात्याने आयुष्यभर भाषाशास्त्रात रमल्या. मराठी भाषेवर त्यांनी निस्सीम प्रेम केले. यातूनच त्यांनी मराठी व्याकरणात प्रदीर्घ काळ संशोधन केले. अभिजात मराठी भाषेसोबतच, अन्य भारतीय भाषांचाही संशोधक म्हणून अभ्यास केला. अन्य भाषांबाबतही त्या तितक्याच जिव्हाळ्याने मांडणी करत.

भाषेचे सौंदर्य खुलवून सांगणारी आणि सौष्ठव समजून देण्याची त्यांची शैली नव्या पिढीलाही भावली. शब्दांचे सौंदर्य आणि व्याकरणदृष्ट्या अचूक वापर याबाबत त्यांनी सहजसोप्या पद्धतीने मांडणी केली. या अंगाने त्यांनी केलेले लेखन, संशोधन मराठी भाषेच्या दृष्टीने अमूल्य ठेवा ठरावे असे आहे. निवृत्तीनंतरही प्रा. शेख भाषाशास्त्रातील संशोधन-अभ्यासात कार्यमग्न राहिल्या. त्यांच्या निधनाने भाषाशास्त्रात अधिकारवाणीने मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. ही मराठी साहित्य क्षेत्रासह, भाषाशास्त्राची मोठी हानी आहे. प्रा. शेख यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे नमूद करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्याकरण तज्ज्ञ, भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा. यास्मिन शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


 Give Feedback



 जाहिराती