सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 विश्लेषण

पुण्यातील सिंहगड रोडवर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; पीएमपी बसमधून पडलेल्या तरुणीचा स्कूल बसखाली येऊन मृत्यू

डिजिटल पुणे    24-08-2026 15:33:01

पुणे : पुण्यातील सिंहगड रोडवर सोमवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. प्रवाशांची गर्दी असलेल्या धावत्या पीएमपी बसमधून खाली पडलेल्या २५ वर्षीय विद्यार्थिनीचा शेजारून जाणाऱ्या स्कूल बसच्या चाकाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. माणिकबाग परिसरातील अप्पासाहेब मोरे चौकाजवळ, ब्रह्मा हॉटेलसमोर सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.

मृत तरुणीचे नाव कांचन बळवंत खड्डा (वय २५) असून ती मूळची राजस्थानमधील हनुमानगड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. कांचन ही खडकवासला येथील संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेत (DIAT) एमटेकच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. ती सेमीकंडक्टर चिप डिझाइन या विषयात उच्च शिक्षण घेत असून भविष्यात संशोधन क्षेत्रात जाण्याचे तिचे स्वप्न होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

डीआरडी लॅबमध्ये प्रात्यक्षिकासाठी निघाली होती

मिळालेल्या माहितीनुसार, कांचन ही डीआयएटीच्या खडकवासला परिसरातील कृष्णा हॉस्टेलमध्ये राहत होती. सोमवारी दिघी येथील डीआरडी लॅबमध्ये प्रात्यक्षिक असल्याने ती सकाळी पीएमपी बसने निघाली होती. बस खानापूरच्या दिशेने स्वारगेटकडे जात असताना सिंहगड रोडवर हा अपघात झाला.

बस माणिकबाग परिसरात आली असता प्रवाशांची मोठी गर्दी होती. कांचन बसच्या पुढील दरवाजाजवळ उभी होती. गर्दीत झालेल्या रेटारेटीत तिचा तोल गेला आणि ती धावत्या बसमधून रोडवर पडली. त्याचवेळी पीएमपी बसच्या अगदी शेजारून स्कूल बस जात होती. रोडवर पडलेली कांचन स्कूल बसच्या चाकाखाली आल्याने ती गंभीर जखमी झाली.

नागरिकांनी तातडीने रुग्णालयात नेले

अपघात घडताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. गंभीर अवस्थेतील कांचनला उपचारासाठी जवळच्या जगताप रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे कांचनच्या कुटुंबीयांवर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दोन्ही बसचालकांची वैद्यकीय तपासणी

अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही बसचालकांना ताब्यात घेतले असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी पीएमपी बस चालक आणि स्कूल बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

अपघाताचे नेमके कारण काय?

कांचन बसमधून नेमकी कशामुळे खाली पडली, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. बसच्या पुढील दरवाजाजवळ प्रवाशांची गर्दी होती का, दरवाजा उघडा होता का किंवा बसच्या हालचालीमुळे तिचा तोल गेला का, याचा तपास केला जात आहे. तसेच स्कूल बस नेमक्या कोणत्या अंतरावरून जात होती आणि चालकाला रस्त्यावर पडलेली तरुणी दिसली होती का, याचाही तपास केला जात आहे.

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासले जात असून त्यातून अपघाताची नेमकी परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घटनेचा पुढील तपास सिंहगड रोड पोलिस करीत आहेत.या दुर्घटनेमुळे पुण्यातील गर्दीच्या मार्गांवर धावणाऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत बसमधील प्रवाशांची संख्या, दरवाजांची सुरक्षितता आणि चालकांकडून घेतली जाणारी खबरदारी याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती