पुणे : पुण्यातील कसबा पेठ परिसरात पती-पत्नीमधील कौटुंबिक वादातून गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत भैरवनाथ मंदिराजवळ सोमवारी ही घटना घडली. या गोळीबारात पतीच्या उजव्या हाताला गोळी लागून तो जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला होता. हा वाद वाढल्यानंतर दोघांमध्ये एकमेकांना गोळी मारण्याबाबत बोलणे झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. याचदरम्यान गोळीबार झाला आणि पतीच्या हाताला गोळी लागली. मात्र, ही गोळी नेमकी कोणी झाडली आणि घटना नेमक्या कोणत्या परिस्थितीत घडली, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे रक्ताचे डाग, एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शस्त्रासह संबंधित पुरावे ताब्यात घेतले आहेत.
दरम्यान, घटनेनंतर पत्नीही रुग्णालयात गेल्याची माहिती आहे. तिची चौकशी केल्यानंतर घटनेबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पती-पत्नीमध्ये वाद नेमका कशामुळे झाला, शस्त्र कोणाच्या ताब्यात होते आणि गोळीबार कशा परिस्थितीत झाला, या सर्व बाबींचा फरासखाना पोलीस तपास करत आहेत.या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून नेमकी वस्तुस्थिती काय समोर येते, याकडे आता लक्ष लागले आहे.