सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 जिल्हा

चाकण MIDC मधील उद्योजकांचे मतपरिवर्तन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 8 आश्वासने, अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

डिजिटल पुणे    24-08-2026 16:37:01

पुणे : चाकण-शिक्रापूर औद्योगिक पट्ट्यातील रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, वाहतूक कोंडी आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांमुळे त्रस्त झालेल्या उद्योजकांच्या समस्यांवर आता शासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 23 ऑगस्ट रोजी चाकणला भेट देत सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच उद्योजकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी एम-60 हार्डनर तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जात आहे, याचीही शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी रस्ते, वाहतूक, वीज, पाणी आणि पोलिसांशी संबंधित प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

उद्योजकांसाठी 8 महत्त्वाच्या उपाययोजना

1. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष

उद्योजकांच्या समस्या जलदगतीने सोडवण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. दर महिन्याच्या पहिल्या आणि चौथ्या बुधवारी या कक्षाची विशेष बैठक होणार आहे.

 

2. प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीला गती

चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तळेगाव-शिक्रापूर या 54 किलोमीटर मार्गाची दुरुस्ती, नाशिक फाटा-राजगुरुनगर रस्ता तसेच एमआयडीसी आणि पीएमआरडीए हद्दीतील अंतर्गत रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

3. रस्त्यांसोबत फुटपाथ, युटिलिटी आणि सायकल ट्रॅक

नवीन रस्ते बांधताना विविध शासकीय यंत्रणांनी एकत्रित आराखडा तयार करावा. त्यामध्ये फुटपाथ, युटिलिटी सुविधा आणि सायकल ट्रॅकचाही समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

4. कामगारांसाठी स्थानिक वसाहतींचा विचार

चाकणमध्ये कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवासाचा वेळ वाचावा यासाठी औद्योगिक क्लस्टरच्या माध्यमातून स्थानिक वसाहती विकसित करण्याचा विचार केला जाणार आहे.

5. ‘मैत्री’ अॅपचा वापर

उद्योजकांना येणाऱ्या विविध प्रशासकीय अडचणी आणि प्रश्नांच्या निराकरणासाठी ‘मैत्री’ अॅप्लिकेशनचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

6. अधिकारी आठवड्यातून एक दिवस उपलब्ध

उद्योजकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंते आणि संबंधित अधिकारी आठवड्यातून एक दिवस उपलब्ध राहणार आहेत.

7. मेट्रोच्या विस्ताराचा विकास आराखडा

निगडी-चाकण, चाकण-राजगुरुनगर आणि तळेगाव-शिक्रापूर या संभाव्य मेट्रो मार्गांचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश महामेट्रोला देण्यात आले आहेत.

8. वीज, पाणी आणि पोलिसांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन

औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा, पाणीपुरवठा तसेच पोलिसांशी संबंधित अडचणी तातडीने सोडवण्यात येतील, अशी ग्वाही शिंदे यांनी उद्योजकांच्या प्रतिनिधींना दिली.

नेमकं प्रकरण काय?

मर्सिडीज-बेंझ, फोक्सवॅगन, स्कोडा, ह्युंदाई यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमुळे चाकण एमआयडीसीला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांपैकी एक म्हणून ओळख मिळाली आहे. मात्र, गेल्या काही काळापासून रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, वाढती वाहतूक कोंडी, अपघात आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे उद्योजक त्रस्त होते.

या समस्यांमुळे चाकण एमआयडीसीमधील सुमारे 20 लघुउद्योगांनी आपले व्यवसाय सातारा जिल्ह्यातील खंडाळा एमआयडीसीमध्ये स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे चाकणच्या औद्योगिक भवितव्याबाबतही प्रश्न उपस्थित झाले होते.

यानंतर शासनाने उद्योजकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी चाकणला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.

या बैठकीनंतर शासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत उद्योजकांनी समाधान व्यक्त केल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच चाकणमधून उद्योग बाहेर नेण्याच्या भूमिकेत उद्योजकांचे मतपरिवर्तन झाले असून, आता उद्योग स्थलांतराचा निर्णय मागे घेण्याची सकारात्मक भूमिका त्यांनी घेतल्याचे शिंदे यांनी म्हटले.

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या चाकण एमआयडीसीच्या प्रश्नाला आता नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. रस्ते, वाहतूक आणि पायाभूत सुविधांची कामे प्रत्यक्षात किती वेगाने पूर्ण होतात, याकडे आता उद्योजकांसह संपूर्ण औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती