सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 शहर

आविष्कार स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या संशोधनाला नवी झेप: प्राचार्य डॉ. शंकर लावरे

डिजिटल पुणे    25-08-2026 11:02:18

पुणे : विद्यार्थ्यांना संशोधक बनविणारे प्रभावी व्यासपीठ म्हणजे ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धा होय. विद्यार्थ्यांच्या मनातील छोट्या-छोट्या कल्पनांना योग्य दिशा आणि संशोधनाची जोड मिळाल्यास त्यातून संशोधनाचा मोठा वटवृक्ष उभा राहू शकतो, असे प्रतिपादन ट्रिनिटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांनी केले.
महाविद्यालयातील शैक्षणिक व संशोधन समन्वय समितीच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती निर्माण व्हावी व त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने आयोजित उद्बोधन कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.


उपस्थित विद्यार्थ्यांना संशोधनाचे महत्त्व समजावून सांगत असताना डॉ. शंकर लावरे यांनी विद्यार्थ्यांना आविष्कार स्पर्धेची संकल्पना, संशोधनाची प्रक्रिया, संशोधन प्रकल्पाची मांडणी तसेच संशोधन करताना आवश्यक असणाऱ्या विविध बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूच्या समस्या, गरजा, सामाजिक परिस्थिती आणि दैनंदिन जीवनातील अनुभवांचा बारकाईने विचार करून त्यातून संशोधनाच्या कल्पना विकसित करण्याकडे भर देण्याची गरज व्यक्त केली. तसेच केवळ मोठ्या विषयांमध्येच संशोधनाच्या संधी असतात असे नाही, तर आपल्या सभोवतालच्या छोट्या समस्यांमधूनही नावीन्यपूर्ण संशोधनाची सुरुवात होऊ शकते असे नमूद करून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनाशक्तीचा, कौशल्याचा आणि ऊर्जेचा वापर करून नावीन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.


आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या कल्पनांना योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी महाविद्यालयामार्फत सातत्याने आयोजित विविध शैक्षणिक व संशोधनविषयक उपक्रमांवर भाष्य केले. त्याचबरोबर आविष्कार संशोधन स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना प्रत्यक्ष संशोधन प्रकल्पाच्या स्वरूपात मांडण्याची संधी मिळत असून या संधीचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लाभ घेऊन आपल्या कल्पनांना संशोधनाची दिशा द्यावी, असे मत व्यक्त केले.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आविष्कार संशोधन स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना व संशोधन प्रकल्प सादर करण्याची संधी उपलब्ध होते. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनाची योग्य दिशा मिळावी, संशोधन प्रकल्प तयार करताना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात आणि विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने स्पर्धेत सहभागी व्हावे, या उद्देशाने महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या विशेष व्याख्यानामध्ये सुमारे २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून संशोधन प्रकल्पाच्या संकल्पना, विषय निवड, संशोधन पद्धती आणि स्पर्धेतील सहभागाबाबत माहिती जाणून घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाविषयी उत्सुकता निर्माण होऊन नावीन्यपूर्ण कल्पनांना चालना मिळण्यास मदत झाली.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नागेश भंडारी यांनी केले. पाहुण्यांची ओळख कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. राणी भगत यांनी करून दिली तर आभार डॉ. क्रांती बोरावके यांनी मानले. कार्यक्रमाच्या संपूर्ण यशस्वीतेसाठी डॉ. चंदा हासे, डॉ. अमृता इनामदार, डॉ. सुभाष वाव्हळ, प्रा. शीतल शेकडे, डॉ. मनीषा शिंदे, डॉ. गीतांजली शेलार, प्रा. वीणा कारंडे, विश्वास सस्ते, प्रणित पावले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 Give Feedback



 जाहिराती