पुणे : उच्च शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून राजस्थानमधून पुण्यात आलेल्या २५ वर्षीय विद्यार्थिनीचा सिंहगड रोडवरील माणिकबाग परिसरात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. पीएमपीएमएल बसमधून उतरत असताना तोल जाऊन रस्त्यावर पडलेल्या विद्यार्थिनीला शेजारून जाणाऱ्या स्कूल बसची धडक बसली. या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला. कांचन बळवंत खड्गा असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कांचन ही मूळची राजस्थानमधील हनुमानगड येथील रहिवासी होती. ती खडकवासला येथील संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेत (DIAT) सेमीकंडक्टर चिप डिझाइन या विषयात एम.टेक.च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. संस्थेच्या परिसरातील कृष्णा हॉस्टेलमध्ये तिचा मुक्काम होता. शिक्षणात पुढे जाऊन चिप डिझाइनच्या क्षेत्रात पीएच.डी. करण्याचे तिचे स्वप्न होते.
प्रात्यक्षिकासाठी निघाली आणि काळाचा घाला
सोमवारी दिघी येथील डीआरडीओच्या प्रयोगशाळेत कांचनचे प्रात्यक्षिक होते. त्यासाठी ती सकाळी खडकवासला येथून पीएमपीएमएल बसने निघाली होती. सकाळी साधारण पावणेदहा वाजण्याच्या सुमारास बस सिंहगड रोडवरील माणिकबाग परिसरातील अप्पासाहेब मोरे चौकाजवळ आली. याच परिसरात बसमधून उतरताना कांचनचा तोल गेला आणि ती रस्त्यावर पडली.
कांचन रस्त्यावर पडताच त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या स्कूल बसच्या चाकाखाली ती आली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि जखमी कांचनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
अपघातानंतर कांचनला हिंगणे खुर्द परिसरातील जगताप रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कांचनच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
दोन्ही वाहनांच्या चालकांची चौकशी
घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही वाहनांच्या चालकांना ताब्यात घेतले असून अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत घडला, याचा तपास सुरू केला आहे. चालकांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. बसची स्थिती, चालकांचे वर्तन, रस्त्यावरील परिस्थिती आणि अपघाताच्या वेळी नेमके काय घडले, याची माहिती पोलीस तपासत आहेत. या प्रकरणात दोन्ही चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
BHUमधून अभियांत्रिकीचे शिक्षण; पीएच.डी.चे स्वप्न अधुरे
कांचनने बनारस हिंदू विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर तिने सेमीकंडक्टर चिप डिझाइनसारख्या तांत्रिक आणि भविष्यातील महत्त्वाच्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. एम.टेक.चे शिक्षण सुरू असतानाच पुढे पीएच.डी. करण्याची तिची तयारी सुरू होती.
मात्र, पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या कांचनच्या आयुष्याचा प्रवास एका दुर्दैवी अपघातामुळे अचानक थांबला. उच्च शिक्षण, संशोधन आणि करिअरच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या एका गुणी विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांसह मित्रमैत्रिणी आणि शैक्षणिक वर्तुळातही हळहळ व्यक्त होत आहे.
सिंहगड रोडवरील या दुर्घटनेने पुन्हा एकदा सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघाताचे नेमके कारण आणि कोणाची निष्काळजीपणा होता, याचा तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.