सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 DIGITAL PUNE NEWS

स्वतःच्या मृत्यूची खोटी बातमी पाहून अभिनेता सिद्धार्थ जाधव संतापला; म्हणाला, ‘एवढी कसली घाई आहे तुम्हाला? सुधरा जरा!’

डिजिटल पुणे    25-08-2026 11:37:13

मुंबई : सोशल मीडियावर सध्या अफवा आणि खोट्या बातम्या वेगाने व्हायरल होताना दिसतात. याचा फटका आता मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव यालाही बसला आहे. सिद्धार्थ जाधव गंभीर आजाराने त्रस्त असून मृत्यूशी झुंज देत असल्याचा दावा करणारी एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. स्वतःबद्दलची ही बातमी पाहिल्यानंतर सिद्धार्थने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

एका युट्यूब चॅनलवर ‘अभिनेते सिद्धार्थ जाधव यांची मृत्यूशी झुंज, गंभीर आजार’ अशा आशयाची बातमी प्रसारित करण्यात आली होती. ही बातमी सिद्धार्थच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने संबंधित व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. विशेष म्हणजे, स्वतःच्या मृत्यूची बातमी पाहताना सिद्धार्थला हसू आवरलं नाही. त्यानंतर त्याने खोटी बातमी पसरवणाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.

‘मी ठणठणीत बरा आहे...’

व्हिडीओ शेअर करत सिद्धार्थने स्पष्ट केलं की, तो पूर्णपणे ठीक असून त्याचं कामही नियमितपणे सुरू आहे. ‘ॲनिमल’ नाटकाचे प्रयोग आणि ‘धिंगाणा’चं शूटिंग सुरू असल्याचं त्याने सांगितलं. तसेच त्याच्या तब्येतीची काळजी घेऊन फोन आणि मेसेज करणाऱ्या चाहत्यांचे त्याने मनापासून आभार मानले.

सिद्धार्थ म्हणाला, “मी ठणठणीत बरा आहे. व्यवस्थित ‘ॲनिमल’चे प्रयोग आणि ‘धिंगाणा’चं शूट सुरू आहे. ज्या-ज्या लोकांनी काळजीने मेसेज आणि कॉल केले, त्यांचे मनापासून धन्यवाद. बातमीदार जरा मलातरी विचारा. एवढी कसली घाई आहे तुम्हाला?”

‘ज्याने हेडलाईन केली त्याला नोबेल द्यायला हवं’

खोटी बातमी करणाऱ्यावर सिद्धार्थने उपरोधिक शब्दांत निशाणा साधला. “ज्याने हेडलाईन किंवा कव्हरेज बनवलंय, त्याला तर नोबेल द्याच,” असं म्हणत त्याने संबंधित बातमीदाराची खिल्ली उडवली. तसेच कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी किमान संबंधित व्यक्तीकडून माहितीची खातरजमा करावी, असा अप्रत्यक्ष संदेशही त्याने दिला.

‘सुधरा जरा’ असं म्हणत सिद्धार्थने खोटी माहिती पसरवणाऱ्यांना फटकारलं. त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांनीही कमेंट्सच्या माध्यमातून त्याला पाठिंबा दिला असून खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

खोटी बातमी ठरली नाटकाच्या प्रमोशनची संधी!

या संपूर्ण प्रकारातही सिद्धार्थने आपला मिश्कील अंदाज सोडलेला नाही. “हे सगळं जाऊ द्या, निदान माझ्या नाटकाचं तरी प्रमोशन करतोय,” असं म्हणत त्याने ‘ॲनिमल’ नाटकाच्या प्रयोगाची माहिती दिली. त्यामुळे गंभीर विषयावर प्रतिक्रिया देतानाही त्याने आपल्या खास विनोदी शैलीत परिस्थिती हाताळल्याचं पाहायला मिळालं.

सिद्धार्थच्या कामाचीही जोरदार चर्चा

सिद्धार्थ जाधव हा मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय आणि हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयासोबतच भन्नाट टायमिंग आणि विनोदी शैलीमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मराठीसोबतच त्याने हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. रोहित शेट्टी यांच्या चित्रपटांमध्येही त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

सध्या सिद्धार्थ ‘ॲनिमल’ या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर सक्रिय आहे. तसेच ‘होऊ दे धिंगाणा 2’मधून तो पुन्हा एका नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे स्वतःच्या मृत्यूची खोटी बातमी व्हायरल झाल्यानंतर सिद्धार्थने दिलेली ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.


 Give Feedback



 जाहिराती