पुणे : पुणे शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये विद्युत यंत्रणा, पंपिंग व्यवस्था आणि स्थापत्यविषयक तातडीची देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांचा परिणाम शहरातील अनेक भागांच्या पाणीपुरवठ्यावर होणार असून गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी बहुतांश भागांत दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवार २६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून गुरुवार २७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संबंधित भागातील पाणीपुरवठा बंद राहील. त्यानंतर शुक्रवारी सकाळी उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी २७ ऑगस्टपूर्वी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.
दरम्यान, मध्यवर्ती पेठा तसेच नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) परिसरातील पाणीपुरवठा नियमित राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
कोणत्या भागांत पाणीपुरवठा बंद?
पर्वती परिसर : सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरचा काही भाग, महर्षीनगर, चिंतामणीनगर, गंगाधाम, अप्पर व लोअर इंदिरानगर, लेकटाउन, डायस प्लॉट, सॅलिसबरी पार्क, पर्वती गावठाण, जनता वसाहत आणि लगतचा परिसर.
भामा आसखेड–लोहगाव परिसर : कळस, धानोरी, टिंगरेनगर, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, खराडी तसेच आळंदी नगर परिषद व लगतचा परिसर.
कोथरूड, बावधन व कर्वेनगर : बावधन, भुसारी कॉलनी, पौड रस्ता, पौड फाटा, मयूर कॉलनी, कर्वे रस्ता, विठ्ठल मंदिर, सहवास, गोसावी वस्ती, करिश्मा परिसर, नळस्टॉप ते दशभुजा गणपती, मंगेशकर रुग्णालय परिसर, महात्मा सोसायटी, वारजे माळवाडी, तपोधाम, काकडे सिटी, कर्वेनगर गावठाण आणि कॅनॉल रस्ता.
बाणेर, बालेवाडी व पाषाण : बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, सूस रोड, भूगाव, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, गणराज चौक आणि पॅनकार्ड क्लब परिसर.
औंध व शिवाजीनगर : गोखलेनगर, औंध, बोपोडी, विद्यापीठ परिसर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, खडकी आणि सकाळनगर.
कात्रज व धनकवडी : संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक व खुर्द, वंडर सिटी, बालाजीनगर, सुखसागरनगर भाग १ व २, कात्रज गावठाण आणि येवलेवाडी.
खडकी व कँटोन्मेंट : मुळा रोड, खडकी कँटोन्मेंटचा संपूर्ण परिसर, एमईएस आणि हरिगंगा सोसायटी.
शिवणे व उत्तमनगर : वारजे हायवे परिसर, रामनगर, उत्तमनगर, शिवणे आणि कोंढवे धावडे.
महापालिकेच्या नियोजित कामांमुळे पाणीपुरवठा यंत्रणा काही काळ प्रभावित होणार आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी पाण्याचा वापर नियोजनपूर्वक करावा आणि गुरुवारच्या पाणीपुरवठा बंदीपूर्वी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.