नांदेड : लोहा तालुक्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीने चिमुकलीला सोबत नेले आणि तिच्यासोबत गैरकृत्य केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (२४ ऑगस्ट) सायंकाळी चिमुकली घरासमोरील अंगणात खेळत होती. यावेळी शेजारी राहणाऱ्या नातेवाईक व्यक्तीने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवले आणि तो तिला सोबत घेऊन गेला. सुमारे २० ते २५ मिनिटांनंतर तो चिमुकलीला घरी सोडून निघून गेला.
घरी परतल्यानंतर चिमुकली रडत असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. आईने विचारपूस केल्यानंतर चिमुकलीने तिच्यासोबत गैरकृत्य झाल्याचे सांगितल्याची माहिती आहे. संबंधित व्यक्तीला ती नात्याने ‘बाबा’ अशी हाक मारत असल्याचेही समोर आले आहे.
घटनेनंतर पालकांनी चिमुकलीला तातडीने नांदेड येथील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून, सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून मंगळवारी (२५ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास संशयिताविरोधात पोक्सो कायद्यासह अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. तीन वर्षांच्या चिमुकलीसोबत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.