सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 DIGITAL PUNE NEWS

कोल्हापुरात ‘होम मिनिस्टर’चा विश्वविक्रम; २,५०० हून अधिक महिलांनी केले आदेश बांदेकरांचे औक्षण

डिजिटल पुणे    25-08-2026 17:13:30

कोल्हापूर : महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रम ‘होम मिनिस्टर’ने नव्या पर्वाची सुरुवातच दणक्यात केली आहे. कोल्हापुरात तब्बल २,५०० हून अधिक महिलांनी एकाच वेळी आदेश बांदेकर यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करत विश्वविक्रमाची नोंद केली आहे. या अनोख्या उपक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये करण्यात आली.

२३ ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील मंगळवार पेठ येथील प्रिन्सेस पद्मराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये हा विक्रमी सोहळा पार पडला. मोठ्या संख्येने महिला एकत्र येत आदेश बांदेकरांचे औक्षण करत महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवले.

‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचा महाराष्ट्रातील प्रेक्षकांशी गेल्या दोन दशकांपासून जिव्हाळ्याचा संबंध आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तसेच देशभर प्रवास करत या कार्यक्रमाने असंख्य कुटुंबांशी आणि विशेषतः महिलांशी आपलेपणाचे नाते निर्माण केले आहे. नव्या पर्वाच्या सुरुवातीलाच झालेला हा विश्वविक्रम त्या नात्याला आणखी अधोरेखित करणारा ठरला.

औक्षण ही महाराष्ट्राच्या संस्कृतीतील प्रेम, आदर आणि आशीर्वाद व्यक्त करण्याची पारंपरिक पद्धत मानली जाते. याच परंपरेला केंद्रस्थानी ठेवत कोल्हापुरात हजारो महिलांनी एकत्र येऊन आदेश बांदेकरांचे औक्षण केले. त्यामुळे हा सोहळा केवळ विक्रमापुरता मर्यादित न राहता सांस्कृतिक एकतेचेही प्रतीक ठरला.

या विक्रमी उपक्रमाबद्दल बोलताना आदेश बांदेकर यांनी सहभागी झालेल्या महिलांचे आभार मानले. “हा माझ्यासाठी केवळ विश्वविक्रम नसून महाराष्ट्रातील असंख्य वहिनींनी दिलेल्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा क्षण आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

तब्बल २० वर्षांच्या यशस्वी प्रवासानंतर ‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाची सुरुवात अशा ऐतिहासिक विक्रमाने झाल्याने कार्यक्रमाच्या टीमसाठी हा क्षण विशेष ठरला आहे. कोल्हापुरातील हजारो महिलांचा सहभाग आणि पारंपरिक औक्षणाचा भव्य सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.


 Give Feedback



 जाहिराती