सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 DIGITAL PUNE NEWS

प्रेमप्रकरणातून MPSC पेपरफुटीचा संशय; औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द, फेरपरीक्षा होणार

डिजिटल पुणे    26-08-2026 15:08:21

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 मार्च 2026 रोजी झालेल्या चाळणी परीक्षेच्या प्रश्नसंचाबाबत मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या प्राथमिक चौकशीत एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याचा फायदा झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

दरम्यान, या पेपरफुटीमागे प्रेमप्रकरणाचा कनेक्शन असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. एका उमेदवाराने आयोगातील कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्याशी संपर्क साधून प्रश्नपत्रिका मिळवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक तपासानुसार प्रश्नसंचाचा लाभ केवळ एका उमेदवाराला झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

एका उमेदवाराच्या गैरप्रकाराचा फटका हजारो विद्यार्थ्यांना

पेपरफुटीचा फायदा एका उमेदवाराला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असले तरी आयोगाने परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया रद्द केली आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी मेहनत घेतलेल्या इतर सर्व उमेदवारांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. एका कथित गैरप्रकारामुळे अनेक महिन्यांची मेहनत आणि वेळ पुन्हा खर्ची पडणार असल्याने उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

22 मार्चला झाली होती चाळणी परीक्षा

औषध निरीक्षक पदासाठीची चाळणी परीक्षा 22 मार्च 2026 रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवरील परीक्षा केंद्रांवर ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 12 जून रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर मुलाखतीसाठी 506 उमेदवार पात्र ठरले होते.

यापैकी 488 उमेदवारांच्या मुलाखती 1 जुलै ते 22 जुलै 2026 या कालावधीत घेण्यात आल्या. 22 जुलै रोजी मुलाखती पूर्ण झाल्यानंतर 485 पात्र आणि 3 अपात्र अशा एकूण 488 उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.

आता पुन्हा परीक्षा; उमेदवारांकडून शुल्क आकारणार नाही

पेपरफुटीच्या संशयामुळे आयोगाने औषध निरीक्षक, गट-ब या पदाची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच फेरपरीक्षेसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.फेरपरीक्षेची तारीख आणि इतर तपशील स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान, पेपरफुटीच्या कथित प्रकरणातील प्रेमप्रकरणाचा नेमका संबंध काय आहे, प्रश्नसंच कुठून मिळाला आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती