रत्नागिरी : पावसाळ्यातील समुद्राची धोकादायक स्थिती काही प्रमाणात निवळल्यानंतर गणपतीपुळे समुद्रकिनारा अखेर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. तब्बल दोन महिन्यांपासून समुद्रात जाण्यास घातलेली बंदी हटवण्यात आल्याने पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गणपतीपुळे ग्रामपंचायतीने २४ ऑगस्ट रोजी दुपारपासून समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून समुद्रातील धोक्याची तीव्रताही काही प्रमाणात घटली आहे. त्यामुळे स्थानिक व्यावसायिक आणि ग्रामस्थांकडून बीच सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे सातत्याने मागणी केली जात होती.
सोमवारी झालेल्या विशेष ग्रामसभेत व्यापारी आणि ग्रामस्थांनी बीच खुला करण्याची जोरदार मागणी केली. पर्यटन व्यवसायावर परिणाम होत असल्याने तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायतीने पर्यटकांसाठी किनारा खुला करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, ग्रामपंचायतीने बीच खुला केला असला तरी जिल्हा प्रशासनाची अद्याप याला अधिकृत मंजुरी मिळालेली नाही. समुद्रात उतरणे अजूनही काही प्रमाणात धोकादायक असल्याने याबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेला ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून पत्र देण्यात आले आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले असून समुद्राच्या खोल पाण्यात न उतरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच किनाऱ्यावर तैनात जीवरक्षक आणि पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.बीच खुला झाल्याने गणपतीपुळ्यात पुन्हा पर्यटकांची वर्दळ वाढली असून स्थानिक पर्यटन व्यवसायाला दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.