सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 विश्लेषण

नेपाळमध्ये पावसाविना महापूर; २९१ विदेशी नागरिक बेपत्ता, १०५ भारतीयांचा समावेश

डिजिटल पुणे    26-08-2026 17:07:05

नेपाळ : नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी आपत्ती ओढवली आहे. विशेष म्हणजे परिसरात पाऊस नसतानाही तिबेटच्या दिशेने आलेल्या पाण्यामुळे नदीला मोठा पूर आला. या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून २९१ विदेशी नागरिक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये १०५ भारतीय नागरिकांचा समावेश आहे.

नेपाळ पर्यटन मंडळाच्या प्राथमिक माहितीनुसार, उत्तर नेपाळमधील भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे रसुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि स्याफ्रुबेसी परिसराला मोठा फटका बसला आहे. पुराच्या जोरदार प्रवाहात अनेक घरे, वाहने, रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत.

कैलास मानसरोवर यात्रेसाठी तिबेटच्या दिशेने निघालेले सुमारे ४०० भाविक रसुवागढी परिसरात अचानक आलेल्या पुरानंतर संपर्काबाहेर गेले आहेत. त्यामुळे बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्याला वेग देण्यात आला आहे.

नेपाळ-चीन सीमेवरील अनेक गावांमध्ये पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने त्रिशूली नदी खोऱ्यातील रसुवा, नुवाकोट, धादिंग, चितवन आणि गोरखा या पाच जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, नेपाळमधून येणाऱ्या पाण्यामुळे भारतातील बिहारमध्येही पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. गंडक नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याचा धोका लक्षात घेऊन बिहार प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे.

मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. बेतिया, मोतीहारी, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर, वैशाली, सीतामढी आणि शिवहर या संवेदनशील जिल्ह्यांतील प्रशासनाला बचाव व मदतकार्याची तयारी पूर्ण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नदीच्या पाणीपातळीवर चोवीस तास लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.नेपाळमधील या अचानक आलेल्या पुरामुळे भारतासह अनेक देशांतील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून बेपत्ता नागरिकांचा शोध आणि बचावकार्य हे सध्या प्रशासनासमोरील प्रमुख आव्हान आहे.


 Give Feedback



 जाहिराती