सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले; हायकोर्टातही जाणार, मुंबईत परप्रांतीय चालकांची दादागिरी
  • मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
 जिल्हा

अमरावती आग दुर्घटनेवरून सुषमा अंधारे आक्रमक; “पालकमंत्री बावनकुळे राजस्थानमध्ये पाणीपुरी खात आहेत”

डिजिटल पुणे    26-08-2026 17:33:51

अमरावती : अमरावती येथील जिल्हा स्त्री शासकीय रुग्णालयातील नवजात शिशू कक्षाला लागलेल्या आगीत तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेनंतर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रुग्णालयाला भेट देत प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास नवजात शिशू कक्षातील व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग वेगाने पसरल्यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी कक्षातील बालकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कक्षात नऊ बालके होती. मात्र, या दुर्घटनेत तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रुग्णालयाला भेट दिल्यानंतर सुषमा अंधारे यांनी चौकशी प्रक्रियेवरही नाराजी व्यक्त केली. “मी एक आई आहे, आईचं दुःख मी समजू शकते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला आणि दोन आमदारांना घटनेची माहिती घेण्यासाठी पाठवलं आहे,” असे त्यांनी सांगितले.

अंधारे यांनी फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट उपलब्ध नसल्याचा दावा करत जिल्हा शल्यचिकित्सकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दुर्घटनेची शक्यता माहिती असतानाही प्रतिबंधात्मक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, असा सवाल करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

रुग्णालयातील स्थानिक पद्धतीने करण्यात आलेले वायरिंग दुर्घटनेला कारणीभूत ठरले असण्याची शक्यताही अंधारे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला.

“मुख्यमंत्री तर सोडाच, पालकमंत्री बावनकुळेही येथे फिरकले नाहीत. त्यांना मुख्यमंत्रीपदाशिवाय दुसरे काही दिसत नाही,” असा आरोप करत बावनकुळे राजस्थानमध्ये पाणीपुरी खात असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे अंधारे म्हणाल्या.

दरम्यान, रुग्णालयात ‘शिलर’ कंपनीचे व्हेंटिलेटर पुरवणाऱ्या व्यक्तीचे सरकारमधील काही व्यक्तींशी संबंध आहेत का, अशी शंकाही अंधारे यांनी उपस्थित केली. आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांना आमदार नितीन देशमुख यांनी फोनवरून जाब विचारल्याची माहितीही त्यांनी दिली.या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.


 Give Feedback



 जाहिराती