मुंबई : बाजारातून अन्नपदार्थ किंवा कोणतेही खाद्य उत्पादन खरेदी करताना ग्राहकांनी केवळ त्याच्या आकर्षक पॅकिंगवर किंवा ब्रँडच्या नावावर विश्वास न ठेवता उत्पादनाची संपूर्ण माहिती तपासावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. आपण जे खातो त्याच्या गुणवत्तेबाबत जागरूक राहणे ही प्रत्येक ग्राहकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खरेदीपूर्वी ‘या’ गोष्टी तपासा
एखादे खाद्यपदार्थ किंवा उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्यामध्ये वापरण्यात आलेले घटक, उत्पादनाची निर्मिती तारीख, मुदत संपण्याची तारीख आणि ते उत्पादन नेमके कशा पद्धतीने तयार किंवा प्रक्रिया करण्यात आले आहे, याची माहिती घेणे आवश्यक आहे. उत्पादन दर्जेदार असल्याचा केवळ अंदाज न बांधता उपलब्ध माहितीची पडताळणी करणे महत्त्वाचे असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
ग्राहकांची जागरूकता ठरते महत्त्वाची
ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना आवश्यक प्रश्न विचारले पाहिजेत. आपण नेमके काय खरेदी करीत आहोत, त्याची गुणवत्ता आणि विश्वासार्हता किती आहे, याची माहिती घेणे गरजेचे आहे. उत्पादनाकडे दुर्लक्ष करून केवळ नाव किंवा दिसण्यावरून खरेदी केल्यास अपेक्षित गुणवत्ता न मिळण्याची शक्यता असते.
नियामक यंत्रणांचीही जबाबदारी
अन्न व औषध प्रशासनासारख्या नियामक यंत्रणांवर नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे मुंढे यांनी नमूद केले. नागरिकांनीही आपली भूमिका बजावत खरेदीपूर्वी उत्पादनाची माहिती तपासल्यास सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाच्या दृष्टीने ते महत्त्वाचे पाऊल ठरेल.